वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत असताना या परीक्षांची माहिती मिळाली आणि मग हळूहळू अधिक माहिती मिळवत त्यांनी या परीक्षा देण्याचे निश्चित केले. आणि अभ्यास सुरु केला.  मार्गी या संस्थेतून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वेळोवेळी मार्गीचे प्रविण चव्हाण यांनी मागर्दर्शन केल्यामुळे गोष्टी सोप्या होत गेल्या असे ते म्हणतात.

ऋषिकेश यांनी तीनवेळा पूर्व परीक्षा दिली आहे. ते म्हणतात, ‘या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पूर्व परीक्षा हा अवघड टप्पा असतो. कारण इथेच पुढची चाळण लागणार असते. माझी पूर्व परीक्षा सुटत नव्हती तेव्हा पुन्हा प्रविण चव्हाण यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सल्ला दिला. त्यांनी दिलेल्या १०० प्रश्नपत्रिकांपैकी ९२ प्रश्नपत्रिका मी सोडविल्या त्यामुळे पूर्व परीक्षा पार करणे सोपे झाले.’ मुख्य परीक्षेसाठीही निबंध लेखनाचा बराच सराव केल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही पातळीवर यश मिळवत त्यांनी ६८८ रँक मिळविला आहे. त्यांना जिल्हाधिकारी पद हवे असल्याने सध्या मिळेल ते पद स्वीकारून पुन्हा तयारी करणार असल्याचे ते सांगतात.

कुपोषित मुलांसाठी काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांना त्यांच्या या यशामुळे अत्यंत आनंद झाला आहे. या क्षेत्रात यश मिळवू इच्छिणाऱ्या तसेच नव्याने या क्षेत्राचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवला पाहिजे तसेच हे क्षेत्र आव्हानात्मक असल्याने मानसिक स्थिरता ही महत्वाची असते असे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधी ठरवून तेवढ्याच काळात स्वतःला झोकून देऊन पर्यटन केले पाहिजेत आणि जरी यश आले नाही तरी आपला दुसरा एखादा प्लान बी तयार असला पाहिजे असे ते म्हणतात.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com