करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून दिलंय.
काही दिवसांपूर्वीच चारुदत्त साळुंखे याची भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून निवड झाली होती. अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत त्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले होते. आता पुन्हा इंजिनिअरिंग सर्विसेस मध्ये देशात पहिला येऊन गावाकडच्या पोरांचा नादच खूळा हे दाखवून दिलंय.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे ! मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला ९४.५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण करणाऱ्या चारुदत्त साळुंखे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.
दरम्यान, CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असतानादेखील खाजगी क्षेत्रात जॉब न करता ज्या क्षेत्रातून आपण राहतो त्या समाजाला पर्यायाने आपल्या देशाला फायदा होईल अशा क्षेत्रात म्हणजेच शासकीय सेवांत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. आज चारुदत्त याच्या प्रयत्नांना यश आले आहे. देशात प्रथम आल्याने त्याचा सर्वत्र गौरव केला जात आहे.