Success Story : सख्ख्या बहीण-भावंडांनी करुन दाखवलं; घरीच अभ्यास करुन दिली MPSC; दोघे झाले इंजिनिअर

करिअरनामा ऑनलाईन । पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत (Success Story) पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत त्यांनी जिद्दीच्या जोरावर भरघोस असं यश मिळवलं आहे.
पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे भावंडे सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव (ता. कराड) येथील रहिवासी आहेत. या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे. पृथ्वीराज यांनी व्ही.जे. टी.आय. मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे (Success Story) तर प्रियांका यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक.डिग्री संपादित केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे सारे श्रेय आई- वडिलांना दिले आहे. वडील प्रशांत पाटील हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहेत. तर आई गृहिणी आहे.

अशी होती अभ्यासाची रणनिती
पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे बहिण-भावंडे दररोज दहा तास एकत्र अभ्यास करायचे. दोघांनीही घरीच राहून अभ्यास केला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडिलांना दिले आहे. या दोघांनी परीक्षेची मागणी ओळखून त्यानुसार जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलं; याबरोबरच सराव चाचण्या (Success Story) दिल्या. या दोघांनी भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडविल्या. आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत ते बघून पुढची परीक्षा देण्यापूर्वी त्या पहिल्या झालेल्या चुका पाहणे आणि टाईम मॅनेजमेंट करणे या गोष्टी दोघांनीही कटाक्षाने पाळल्या. हे दोघे भावंडे आधी झालेल्या चुकांबाबत एकमेकांशी बोलत असत; त्यामुळे चुका सुधारण्यास मदत होत असे. पृथ्वीराजला पहिल्या प्रयत्नात एका मार्काने अपयश आले होते; परंतु हार न मानता त्याने दुसऱ्या परीक्षेची तयारी करुन यश खेचून आणले.

वडिलांनी कर्ज काढून मुलांना शिकवलं
पृथ्वीराज पाटील यांची MSEB मधील महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता म्हणूनही निवड झाली आहे. पहिला प्रयत्न एक मार्काने संधी हुकल्यानंतर त्याने दुसऱ्यावेळी परीक्षेची तयारी केली. यावेळी त्याच्या सोबत बहिणही होती. भावाच्या मार्गदर्शनामुळे बहिणीला पहिल्याच प्रयत्नात (Success Story) यश मिळाले. पृथ्वीराज सांगतो; “दररोज रात्री आम्ही दोघे भावंडे आणि वडिल शतपावली करायला जायचो त्यावेळी दिवसभर केलेल्या अभ्यासाची वडिलांसोबत चर्चा करायचो. वडिल आम्हाला मार्गदर्शन करायचे. आता वडिलांचे दोन्ही मुलांना शासकीय अधिकारी बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना शैक्षणिक कर्ज काढून त्यांनी आम्हा दोघांना इंजिनीयर बनवले आहे.”
या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दोघांनीही (Success Story) घरीच राहून एकत्र अभ्यास करून जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे. त्यांना विद्यासागर अकॅडमीचे शिक्षक, कार्यकारी अभियंता श्री. ओंकार शेंडुरे (जलसंपदा विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com