Success Story : शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर; कोचिंग क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली NEET परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । NEET परीक्षा द्यायचं म्हणजे अभ्यासाचा (Success Story) प्रचंड ताण, पुस्तकांचा खच, कोचिंग क्लास करत असताना घरामध्ये अभ्यासासाठी तयार केलेलं टाईम टेबल.. अशा आघाड्या सांभाळताना विद्यार्थ्यांचं आयुष्य अगदी व्यस्त होवून जातं. पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल; एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने शेतात राबून NEET परीक्षेचा अभ्यास केला आहे तोही कोणताही महागडा कोचिंग क्लास न लावता. या परिक्षेत ती अगदी पहिल्याच प्रयत्नात पास झाली आहे. या लेखातून आज आपण या मुलीची ओळख करुन घेणार आहोत. तिचा संघर्ष नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल.

अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी (Success Story)
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका. येथील कंधारेवाडी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी आता डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन NEET परीक्षेची तयारी केली. या परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात ती NEET Exam परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्यावर आज कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंकुश कंधारे यांच्याकडे अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कंधारे यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे अभ्यासात हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बारावीपर्यंत तिने तीचे शिक्षण गावातच पूर्ण केले.

कोरोना काळात मिळाली डॉक्टर होण्याची प्रेरणा
ज्योती दहावीत असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागले होते. या काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू होती. डॉक्टरांकडून रुग्णांचे प्राण (Success Story) वाचवण्यासाठी सुरु असलेली धडपड पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ज्योतीने सांगितले.

शेतात काम करत युट्यूबच्या मदतीने अभ्यास
ज्योतीने बारावी झाल्यानंतर NEET परीक्षेची तयारी सुरु केली. गावात काही जणांनी ही परीक्षा दिली होती. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत ज्योतीने अभ्यास (Success Story) सुरु केला. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून ती अभ्यास करायची. ती सकाळी शेतात जाऊन 6 तास काम करायची. शेतात थांबून काही तास अभ्यास करुन पुन्हा घरी यायची. घरी आल्यावर पुन्हा ती पाच ते सहा तास अभ्यास करायची. असा तिचा दीनक्रम ठरला होता.

पहिल्याच प्रयत्नात झाली पास
ज्योतीला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले आहेत. यामुळे तिचं आणि तिच्या आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्योतीला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अडथळ्यांची शर्यत संपण्याची चिन्ह नाहीत. सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला तरच ती डॉक्टर होण्याची शक्यता आहे. खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करण्याची तिची आर्थिक क्षमता नाही.
NEET परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये 13 भाषांमधून परीक्षा घेण्यात आली. तामिळनाडूतील (Success Story) प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम तर राज्यात श्रीनिकेत रवीनं पहिला क्रमांक पटकावला. श्रीनिकेत रवी हा देशातून 7व्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत नाशिकमधील आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे.तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वी रँक आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com