Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार 21,678 जागांवर शिक्षक भरती करणार; जाहिरात प्रसिध्द

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील हजारो उमेदवार प्रतीक्षेत (Shikshak Bharti 2024) असलेल्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल २१ हजार ६७८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सरकारी आणि खासगी शाळेत होणार नवीन भरती (Shikshak Bharti 2024)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता 1ली ते 12वीच्या शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे. शिक्षक पदांसाठीची बिंदूनामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. मात्र बिंदूनामावलीबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने जिल्हा परिषदांच्या १० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील ७० टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे. त्या जागांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे. शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयांवरील धोरण याचे तंतोतंत पालन करून भरतीप्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अशी आहे गटनिहाय पद संख्या –
इयत्ता 1ली ते 5वी – 10,240 पदे
इयत्ता 6वी ते 8वी – 8,127 पदे
इयत्ता 9वी ते 10वी – 2,176 पदे
इयत्ता 11वी ते 12वी – 1,135 पदे

रिक्त पदांचा तपशील
पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील २ हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगरपरिषदांतील (Shikshak Bharti 2024) १ हजार १२३, खासगी अनुदानित ५ हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह ४ हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेविषयी महत्वाचे.. (Shikshak Bharti 2024)
उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दि. ८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ९ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. पद भरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com