पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी जाधव यांची कथा ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. एमपीएससीची परीक्षा हे आव्हान तर होतेच मात्र त्याही आधी पल्लवी यांच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान होते ज्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पुरेपूर सोबत केली. Pallavi Jadhav PSI Biography in Marathi

वयाच्या १५-१६ व्या वर्षीच लग्न करण्याची प्रथा असणाऱ्या गावात १० वी नंतर शिक्षण घेणे म्हणजे जिकीरीचेच काम आणि त्यातही घरची परिस्थिती हलाखीची मात्र हार न मानता आठवडाभर आई-वडिलांना शेतातल्या कामात मदत करून एकच दिवस महाविद्यालयात हजेरी लावत पल्लवी यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र आई वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार सुरु केला. तोपर्यंत आपल्याला काय करायचे आहे याची कल्पना त्यांनाही नव्हती. आईबरोबर एका लग्नात गेल्या असता, एका नातेवाईकांनी एमपीएससी परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले, आई तर तयार झाली मात्र वडिलांना तयार करणे हे आव्हान होते. वडीलही तयार झाले तर पैशाचा प्रश्न होता. मग बचत गटातून व्याजाने ५ हजार रु कर्ज घेवून पल्लवी यांचा एमपीएससीचा प्रवास सुरु झाला. औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी एम.ए ला प्रवेश घेतला. आई-वडिलांवर आपल्या खर्चाचा बोझा पडू नये म्हणून कमवा आणि शिका योजनेत प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. Pallavi Jadhav PSI Age

वर्दीचे आकर्षण त्यांना पीएसआय पदाकडे खेचत होते. पहिल्या प्रयत्नात एसएससी अंतर्गत केंद्रीय पीएसआय साठी त्या पास झाल्या. मात्र फिजिकल मध्ये त्यांना अपयश आले. पण प्रयत्न सुरु ठेवले. मात्र आई-वडिलांना किती दिवस त्रास द्यायचा म्हणून मध्येच पीएसआय च्या परीक्षा देता येतीलच पण पोलीस भारती होवून पुढचा अभ्यास करावा यासाठी त्यांनी भरतीचा फॉर्म भरला पण २ मार्कांनी त्यात अपयश आले. गावात लोकांची खुसफुस सुरु झाली, पोलीस भरती जमली नाही पीएसआय काय होणार… त्या खचून गेल्या. पण यावेळी वडिलांनी धीर दिला, “तुला पोलीस नाही पीएसआय व्हायचे आहे” पुन्हा पल्लवी जोमाने उभ्या राहिल्या. महाराष्ट्र पीएसआय मध्ये त्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. फिजिकल मध्ये धावणे आणि चालणे या दोन्ही परीक्षेत त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. १६० च्या कट ऑफ ला १९५ गुण मिळवून एससी प्रवर्गात दुसरा क्रमांक पटकावत त्या पीएसआय झाल्या.

ऑक्टोबर २०१५ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी मधून त्यांनी एका वर्षाचे फौजदारी प्रशिक्षण पूर्ण केले आणि ठाणे इथे कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाल्या. इथे त्यांच्यावर महिला तक्रार निवारण केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर जालना जिल्ह्यात दामिनी पथकप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली ज्यामुळे महिलांविषयक हक्क आणि अधिकार तसेच मुलीं व महिलांविषयी काम त्यांना करता आले. दामिनी पथकाकडून त्यांनी विध्यार्थ्यांसाठी मुलभूत हक्कांचे धडे देण्यापासून ते बालमजुरी ,बालविवाह ,बालगुन्हेगारी तसेच शालेय महाविद्यालयीन पातळीवर मुलींना स्व-सरंक्षणाचे धडे देण्यासाठीचे शिबिरात्म्क उपक्रम घेतले. जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांनी प्रात्यक्षिके घेतली केवळ आठ महिन्यांमध्ये ७५० शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि क्लासेसना त्यांनी भेटी दिल्या या सोबत बालहक्क सप्ताह देखील राबवले. Pallavi Jadhav PSI Biography in Marathi

कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी देखील त्या जपत आहेत. सामाजिक कार्यक्रमांद्वारे थेट लोकांपर्यंत पोहचता येते, त्यांच्या मूळ समस्या /प्रश्न जाणून घेता येतात, त्यावर उपाययोजना राबवणे सोपे जाते, लोकांशी संवाद साधता येतो असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव सामाजिक कार्याची दखल घेत मुंबईतील परिवर्तन फाऊंडेशन वाशी, यांच्याकडून त्यांचा कणखर सावित्री गुणगौरव पुरस्कार यासाठी नामांकन देवून सन्मान करण्यात आला. मर्दानी परिवार मेहकर बुलढाणा यांच्याकडून ‘मर्दानी २०२०’ पुरस्कार, क्लब माय इंडिया यांच्याकडून ‘तेजस्वी स्त्रीरत्न पुरस्कार २०२०’ देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

पल्लवी जाधव या प्रशासकीय अधिकारी यासोबत उत्तम व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपल्या सोशल मिडियावरून त्या नेहमी कार्यरत असतात. कामासोबत आपला अभिनयाचा छंदही त्यांनी जपला आहे.