NEP 2023 : ‘या’ विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उत्तरे लिहता येणार; पहा काय म्हणाले शिक्षण मंत्री…

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि (NEP 2023) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत; अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले; त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (AICTE) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, डीईएस विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवावे आणि विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषेत ऐकू येईल, असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. अभ्यासक्रम (NEP 2023) विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अधिक चांगल्याप्रकारे समजतात; यासाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.  हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आणि भारतीय संस्कृती, परंपरेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती हा विषय विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात आणावा, यासाठी सरकार आग्रही राहणार आहे.”

राज्यात आतापर्यंत दीड हजार शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु उच्च शिक्षण संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी न केल्यास अशा संस्थांना जगातील कोणत्याही विद्यापीठांची संलग्न होण्याची दारे खुली राहतील. परंतु या शिक्षण संस्था कोणत्याही भारतीय विद्यापीठांशी संलग्न राहणार नाहीत; असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com