MPSC Success Story : शिक्षक भरती रखडली म्हणून MPSC दिली; PSI तर झालीच अन् बेस्ट कॅडेटचा किताबही पटकावला

करिअरनामा ऑनलाईन । तिने लहानपणापासून आपल्या (MPSC Success Story) वडीलांना शाळेत शिकवताना पाहिलं होतं. त्यामुळे तिने ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हायचं. रुबियाने पदवी घेतल्यानंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले पण अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात तिने उपनिरीक्षक पद पटकावलं. एवढेच नव्हे तर तिने प्रशिक्षण घेत असताना बेस्ट कॅडेट इन ड्रीलचा किताबही पटकावला आहे.

वडील शिक्षक तर आई गृहिणी
रुबिया जहीरा ताजुद्दीन मुलाणी ही मूळची सुभाषनगरची (ता. मिरज, जि. सांगली). रुबियाचे वडील ताजुद्दीन मुलाणी हे शिक्षक, तर आई गृहिणी. शिक्षणाचं बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे रुबियाला पहिल्यापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण झाली. रुबियाचे एक काका आर्मीत सैनिक आहेत तर मोठा भाऊ बँकेत नोकरीला आहे.
रुबियानेही शिक्षिका होण्यासाठी ‘टीईटी’ परीक्षेची तयारी केली. परंतु, मधल्या काळात परीक्षा रखडल्या होत्या. त्यामुळे शिक्षक भरतीही रखडली. पण ती निराश झाली नाही. आयुष्यात तिला पुढे जायचं होतं म्हणून तिने वेळ न घालवता पुणे गाठलं आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.

अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात खांद्यावर लागले स्टार
MPSC ची परीक्षा देत असताना पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले. पण तिने खचून न जाता पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला आणि जोमाने तयारी केली. २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत (MPSC Success Story ) ती पास झाली आणि पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर तिची निवड झाली. मुलाणी परिवारातील ती पहिलीच पोलिस अधिकारी झालेली महिला आहे. त्याचा सार्थ अभिमान तिचे आई-वडील बाळगतात.

नेमप्लेटवर आईचे नाव लावणारी रुबिया (MPSC Success Story )
अलीकडे मुले-मुली आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबरच आईचेही नाव लावतात. परंतु, ते कागदोपत्री असतेच, असे नाही. रुबियाने मात्र आपल्या वडिलांसह आईचेही नाव असलेली नेमप्लेट खाकी वर्दीवर लावलेली आहे, हे तिचे वेगळेपण बरेच काही सांगून जाते. ‘रुबिया जहिरा ताजुद्दीन मुलाणी’ अशी नेमप्लेट लावलेली बहुधा ती आज प्रशिक्षण पूर्ण केलेली पहिली पोलिस महिला उपनिरीक्षक असावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com