Job News : बेरोजगारीनं गाठला उच्चांक, ग्रामीण भागाला बसणार मोठा फटका; पहा आकडेवारी काय सांगते…

करिअरनामा ऑनलाईन । खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा (Job News) केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा मोठा फटका ग्रामीण क्षेत्रांना बसताना दिसत असला तरीही त्याचा थेट परिणाम देशातील एकूण रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे.
दर दिवशी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण होतात आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी अनेकजण स्पर्धेत असतात. नोकरदार क्षेत्रांमध्ये हे असं चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. पण, आता मात्र यातही मोठे बदल होताना दिसत असून, सरकारची आणि बहुविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंताही वाढली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसमुहाच्या आकडेवारीनुसार सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी लिमिटेडनं यासंबंधीची माहिती देत ही आकडेवारी समोर आणली. जिथं ऑक्टोबर महिन्यात (Job News) बेरोजगारी 10.05 टक्क्यांवर पोहोचल्याची बाब लक्षात आली. सप्टेंबर महिन्यात हा आकडा 7.09 टक्के इतका होता.
महत्त्वाची बाब म्हणजे मे 2021 मधील आकडेवारीनंतर सध्याच्या बेरोजगारीचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. तेव्हापासून ही आकडेवारी 6.20 टक्के ते 10.82 टक्के अशा फरकानं बदलली. शहरी भागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्यामुळं बेरोजगारीचा हा आकडा 8.44 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरकारची चिंता वाढली (Job News)
देशातील महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी रोजगार निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि बेरोजगारीच्या प्रमाणात होणारी ही वाढ पाहता केंद्र शासनाची चिंता वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काळात भारताच्या GDP चा आकडा 6 टक्क्यांच्या दरानं पुढे जाण्याची शक्यता असली तरीही देशातील तरुण पिढीसाठी रोजगार निर्मिती मात्र अपेक्षित वेगानं होत नसल्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी हा एक अतीव महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.
देशातील माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचं काम करणाऱ्या विप्रो, इन्फोसिस आणि तत्सम कंपन्यांनी नव्यानं नोकरभरती करण्याची प्रक्रिया सध्या थांबवली आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागू शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काळात बेरोजगारी हा देशाच्या विकासातील मोठा अडथळा असेल हे नाकारता येत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com