शाळा, महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सदर बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, सचिव सौरभ विजय आदी सहभागी झाले होते.

राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच पीडीएफ स्वरुपातील बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचे लॉकडाऊन काळात एकूण ६७ लाख वेळा डाऊनलोड झाले आहे. उच्च शिक्षणाचे अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. तसेच सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ऑनलाईन, ई-लर्निंग, डिजिटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. दरवर्षी प्रमाणेच नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल असे नियोजन करा. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घ्यावी, अभ्यास करून आराखडा तयार करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या आहेत.

शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्सचा पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल असाही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विशेषतः कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोनमध्ये शाळा सुरु करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे तिथे मोठा प्रश्न असल्याचे ठाकरे म्हणाले.

शाळा सुरु झाल्या नाहीत, तरीही शिक्षण सुरूच राहील यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु होऊ शकली नाही तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाच विचार करावाच लागेल असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com