Army Success Story : जय हो!! साताऱ्याच्या लेकीने मान वाढवला…आर्मीत पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत

करिअरनामा ऑनलाईन । महिला सर्व क्षेत्रात आपली (Army Success Story) छाप उमटवत आहेत. आपला देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सातारच्या तरुणीने देशाच्या संरक्षण दलातील बहुमान आपल्या नावावर कोरला आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल होण्याचा बहुमान सातारच्या धनश्री देविकीरण सावंत-जगताप यांनी मिळवला आहे. नुकतीच त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली आहे. त्या सध्या दिल्लीत कार्यरत आहेत.

बालपण अन् उच्च शिक्षणही साताऱ्यात
धनाश्री यांचा जन्म लिंब (ता. सातारा) येथे झाला. त्यांचे नर्सरी ते 10वीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये झाले. त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे.

आर्मीतील सेवेची 22 वर्षे
धनश्री सावंत यांनी आपल्या सेवेची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय संरक्षण दलात 2002 मध्ये त्यांची निवड झाली.  त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून (Army Success Story) यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अरुणाचल, तेजपूर, बारामुल्ला, उरी, श्रीनगर, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, दिल्ली अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावली.

वरिष्ठांनी घेतली उत्कृष्ट कामगिरीची दखल (Army Success Story)
भारतीय लष्करासाठी लागणाऱ्या इमारती, विविध प्रकारची बांधकामे, दुरुस्त्या, रस्ते, पूल व संरक्षण दलांतर्गत भूसेना, नौसेना, वायुसेनेसाठी आवश्यक कर्तव्य त्या करत असताना त्यांच्या एकूणच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांना कर्नलपदी पदोन्नती दिली आहे.

असं आहे धनश्री यांचं कुटुंब
धनाश्री यांचे वडील संपतराव लक्ष्मण सावंत हे अभियंता आहेत; तर त्यांच्या आई सौ. ज्योत्सना सावंत या गृहिणी आहेत. धनश्री यांना घरातून देशसेवेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांची मोठी बहीण भाग्यश्री सावंत या भारतीय नौदलातून कमांडरपदावरून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत तर धनश्री (Army Success Story) यांचे पती देविकीरण जगताप (भरतगाववाडी) हे नौदलात कॅप्टनपदी कार्यरत आहेत. धनश्री यांची दुसरी बहिण ॲड. राजश्री सावंत या साताऱ्यात वकिली करत आहेत, तर बंधू श्रीनिवास हे मल्टी नॅशनल कंपनीत उच्च पदावर अधिकारी आहेत. भारतीय संरक्षण दलाच्या नेव्ही आणि आर्मीमध्ये महिला अधिकारी होण्याचा आगळा वेगळा बहुमान कर्नल धनश्री सावंत व भाग्यश्री सावंत या दोन्ही सख्या बहिणींनी मिळवला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. धनश्री यांच्या संपूर्ण वाटचालीत त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्या भारतीय आर्मीमध्ये कर्नल झाल्यानंतर आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं; असल्याची त्यांची भावना आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com