Zilha Parishad Bharti 2023 : मोठी घोषणा!! राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये होणार मेगाभरती; 19 हजार 460 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामविकास विभागांतर्गत (Zilha Parishad Bharti 2023) राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभुमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे.

दि.05 ऑगस्ट 2023 ते दि.25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन दि.25 ऑगस्ट, 2023 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातींच्या (Zilha Parishad Bharti 2023) अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहेत.

संगणकीकृत परीक्षा होणार
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये (ZP) एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी (Zilha Parishad Bharti 2023) ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

IBPS कंपनीमार्फत होणार परीक्षा
परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर परिक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे उमेदवाराने कोणत्याही आमिषास बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सन 2019 पासून परिक्षा झाली नसल्याने उमेदवारांमध्ये असलेली संतापाची भावना लक्षात घेवून प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार IBPS तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावलेला आहे.

कमाल वयोमर्यादेत 2 वर्षाची शिथिलता (Zilha Parishad Bharti 2023)
ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला होता पण वय मर्यादा ओलांडल्याने ते परिक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना दि. 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com