UPSC Success Story : UPSC Success Story : 12वीत मिळाले जेमतेम मार्क; सलग 3 वेळा दिली UPSC आणि बनले IPS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | बारावीत नापास होऊनही कठोर (UPSC Success Story) परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवून आयपीएस पद मिळवणाऱ्या एका अधिकाऱ्याची कहाणी आज आपण वाचणार आहोत. आयुष्यात संघर्ष करायला सज्ज राहण्यासाठी ही कहाणी निश्चितच तुम्हाला प्रेरणा देईल. उमेश गणपत खंडाबहाले यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत 704 वा क्रमांक मिळविला होता. विशेष म्हणजे ते 12वीत नापास झाले होते; तरीही हार न मानता त्यांनी धडपड केली आणि आपलं ध्येय साध्य केलं आहे.

अधिकारी होण्याचं स्वप्न होतं
उमेश हे महाराष्ट्रातील नाशिकच्या महिरावणी (UPSC Success Story) गावचे रहिवासी आहेत. 2003 मध्ये ते 12वीत नापास झाले होते तेव्हा त्यांना इंग्रजीत केवळ 21 गुण मिळाले. त्यांच्या कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी आहे. उमेश यांचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेती करायचे. तसेच त्यांचा डेअरी व्यवसायही होता. उमेश देखील त्यांच्या वडिलांना शेती आणि डेअरी व्यवसायात मदत करायचे. यासोबत त्यांचं शिक्षणही सुरु होतं. कारण उमेश यांना शिक्षण घेवून मोठा अधिकारी व्हायचं ध्येय होतं.

इंग्रजीत नापास तरी इंग्रजी साहित्यात केलं एम.ए. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रस्त्यावरून उमेश दररोज दूध विक्रीसाठी जात असत. एके दिवशी त्यांच्या मनात काय आले आणि त्यांनी विद्यापीठासमोर थांबून चौकशी सुरू केली. सर्व माहिती घेऊन त्यांनी पुन्हा बारावीची परीक्षा दिली. बारावीनंतर त्यांनी B. Sc. हॉर्टिकल्चरमध्ये प्रवेश घेतला. ज्या विषयात ते बारावीत नापास झाले होते त्यालाच त्यांनी आपले बलस्थान बनवले. त्यांनी केटीएचएम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. ही त्यांची कामगिरी अधोरेखीत करण्यासारखी आहे.

सलग तीनवेळा दिली UPSC
अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेश यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला.  2012 मध्ये त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेचा पहिला (UPSC Success Story) प्रयत्न पार केला. सलग 2 वेळा त्यांना अपयश आले; पण त्यांनी जिद्द सोडली नाही. 2015 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता. यावेळी ते पास झाले आणि त्यांनी संपूर्ण भारतातून AIR 704 ही रॅंक मिळवली; आणि ते IPS अधिकारी झाले.

IPS होणारा गावातील पहिला तरुण (UPSC Success Story)
उमेश हे त्यांच्या गावातील पहिली व्यक्ती आहेत जे केंद्रीय लोकसेवा आयोगच्या माध्यमातून आयपीएस (IPS) अधिकारी झाले आहेत. त्यांच्या कामगिरीने निश्चितच गावच्या नावलौकिकात भर पडली आहे. ते असे मानतात की आयुष्यात अपयश आल्यानंतर स्वतःला रीस्टार्ट करणे महत्वाचे आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा संधी दिली तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आयपीएस उमेश यांचा हा मंत्र तरुण उमेदवारांना निश्चितच प्रेरणा देईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com