UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या सफिन हसन या तरुणाची.

“जितक्या जास्त अडचणी तितकं मजबूत मोटिवेशन” 

पावलो पावली अडचणी, ना पोटभर अन्न ना कोणती आर्थिक सुरक्षा. मात्र हसतमुख राहणाऱ्या सफिनला आयुष्यापासूनच कोणतीच तक्रार नव्हती. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, ”जर त्याच्या आयुष्यात या अडचणी आल्या नसत्या, तर तो जिथे पोहचला त्या ठिकाणी कधी पोहचलाच नसता.” सफिनचं साधं सूत्र आहे, जितक्या जास्त अडचणी तितकं मजबूत मोटिवेशन. याच सूत्राने तो पुढे चालत राहिला आणि नशिबाने त्याच्या जिद्दीपुढे गुडघे टेकले.

लहानपणीच घेतला अधिकारी होण्याचा निर्णय – (UPSC Success story of IPS Safin Hassan)

गुजरातमधील कानोदरा हे सफिनचं गाव. येथील प्राथमिक शाळेत एके दिवशी कलेक्टर कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना पाहून सफिनने त्याच्या मावशीला हे कोण आहेत? असं विचारलं. सफिनला समजावं म्हणून मावशीने ते जिल्ह्याचा राजा आहेत असं सांगितलं. तेव्हा सफिनने मोठं होऊन अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. आणि तो कधीही बदलला नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे काही वर्षांमध्येच त्याचे मित्र, नातेवाईक आणि अगदी गावकऱ्यांनाही माहित झालं होतं की, एक दिवस सफिन अधिकारी होणार.

सफिनच्या जिद्दीला शिक्षकांचा मदतीचा हात –

सफिन लहानपणापासूनच जिद्दी होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती गोष्ट पूर्णच करायचा. अकरावीमध्ये त्याला विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा होता, मात्र गावात सुविधा नव्हती. खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याइतपत घरची परिस्थिती नव्हती. दरम्यान, एक नवीन खासगी कॉलेज सुरू झाले होते. सफिनचे जुने शिक्षक त्या कॉलेजमध्ये शिकवत होते. त्यांनीच सफिनच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. त्यांनी सफिनला अभ्यासाची संधी दिली आणि फीच्या ओझ्यातून मुक्तता केली.

नात्यापलीकडील माणुसकी –

पुढे सफिनने एनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला दिल्लीला जाण्याची आणि नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा होती, पण पुन्हा पैशांची अडचण समोर आली. त्यावेळी त्याच्या गावातीलच एका कुटुंबानं सफिनच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत त्याला दिल्लीला पाठवलं. एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान सफिन त्यांच्या संपर्कात आला होता. त्यावेळी हुसेनभाई पोलारा आणि झरीनाबेन पोलारा यांना सफिनमधील क्षमतेचा अंदाज आला होता. ज्यांच्याशी काही नातं नव्हतं अशा लोकांनी मदत केल्यामुळे सफिनची प्रेरणा आणखी वाढली आणि तो आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी जोरदार तयारी करू लागला.

पालकही कमी पडले नाहीत –

सफिनचे वडील मुस्तफा हसन आणि आई नसीम बानो दोघेही एका डायमंड युनिटमध्ये काम करत होते. काही वर्षानंतर अचानक त्यांचे काम सुटले आणि घरात पैशांची मोठी समस्या उभी राहिली, मात्र त्यांनी हार मानली नाही. सफिनच्या वडिलांनी इलेक्ट्रिशियनचे काम सुरू केले, तर आई लग्नात रोट्या बनवण्याच्या ऑर्डर घेऊ लागली. सफिनच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. सफिननेही जिथे शक्य असेल, तिथे पालकांना साथ दिली. तो म्हणतो की, कठोर परिश्रम आणि चांगुलपणाचा धडा त्याने त्याच्या पालकांकडूनच शिकला आहे. त्याचे वडील म्हणायचे की, हेतू स्पष्ट असल्यास सर्व कामे पूर्ण होतात आणि सफिनच्या बाबतीतही असेच घडले. (UPSC Success story of IPS Safin Hassan)

परीक्षा सुरु असताना झाला अपघात –

सफिनच्या नशिबानेही त्याची खडतर परीक्षा घेतली आहे. मेन्सच्या परीक्षेला जात असताना सफिनची स्कूटी घसरली आणि त्याचा अपघात झाला. डाव्या पायाच्या लिगामेंट्स (अस्थिबंध) तुटले होते, हाताला इजा झाली होती आणि डोक्यातून रक्तस्त्राव झाला होता. अशा परिस्थितीत पेन किलर खाऊन त्याने परीक्षा दिली. आठवडाभराच्या परीक्षेनंतर सफिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेथे तो दीड महिना अॅडमिट होता. शिवाय, सफिनला मुलाखतीच्या एक महिन्यापूर्वी देखील हॉस्पिटलमध्येच राहावे लागले होते. मुलाखतीच्या केवळ एका आठवड्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज मिळाला होता.

जीवन तसे नसते तर….

सफिनला यश मिळवण्याची घाई होती. UPSC ची तयारी सुरू करतानाच त्याने निर्धार केला होता की, दुसरा अटेम्प्ट देणार नाही. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास व्हायचं आहे. कदाचित हेच कारण होतं की, अपघातानंतर सफिन हॉस्पिटलऐवजी परीक्षा हॉलमध्ये पोहोचला होता. एका मुलाखतीत जेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक घटना काय आहे असे विचारले, तेव्हा तो सहज हसत म्हणाला, ”कोणीतीही नाही. कारण जर जीवन तसे नसते, तर आज या टप्प्यापर्यंत पोहोचलोच नसतो.”

सफिनच्या मते…

सफिन इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतो की, ”जीवनात नेहमी दोन पर्याय असतात. एक म्हणजे, समोर असलेल्या गोष्टीबद्दल ओरडणे आणि दुसरे म्हणजे, आहे ते स्वीकारणे आणि ते बदलण्यासाठी बाहेर पडणे. त्याने दुसरा मार्ग निवडला.”

अवघ्या २२ व्य वर्षी झाला अधिकारी – (UPSC Success story of IPS Safin Hassan)

२०१७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सफिनने ५७० व्या क्रमांकासह पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आणि जामनगरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. देशातील सर्वात तरुण आयपीएस होण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याला IAS व्हायचे होते, पण मी IPS अधिकारी म्हणून माझी कारकीर्द चालू ठेवीन आणि या संधीचा उपयोग देशाच्या सेवेसाठी करेन, असं म्हणत त्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com