UGC Update : आता पी. एच.डी.ला थेट प्रवेश मिळणार; पदवीधारकांना मिळवावे लागणार ‘एवढे’ मार्क

करिअरनामा ऑनलाईन । जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व (UGC Update) अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला (Ph. D) प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिवाय हे विद्यार्थी यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही; अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी दिली आहे.

मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने यामध्ये एक अट ठेवली आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी मिळवावी लागणार आहे. ही प्रणाली या वर्षीपासून लागू केली जाईल; अशी माहिती UGC अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X अकौंटवरून दिली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत सुरू करण्यात (UGC Update) आलेल्या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी UGCने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. SC, ST, OBC (नॉन-क्रिमी लेयर), अपंग आणि EWS विद्यार्थ्यांना देखील पीएचडी प्रवेशामध्ये पाच टक्के किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची सूट मिळेल. यामुळे चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता थेट UGC NET साठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.

विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा (UGC Update)
दरम्यान, चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. UGC NET साठी, त्यांना विषयाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता विद्यार्थी कोणताही विषय निवडू शकणार आहे. यापुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले विषय निवडणे बंधनकारक असणार नाही. मात्र, पीएचडी साठी अर्ज करतानाच त्यांना त्यासाठीचे विषय ठरवावे लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com