Talathi Bharati : गोंधळात गोंधळ!! तलाठी भरती परिक्षेत विद्यार्थिनीला मिळाले 200 पैकी 214 मार्क; गुन्हेगारही झाले पास

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल समोर (Talathi Bharati) येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला; तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी भरती परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता.

भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये  मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरतीत टॉप ठरलेल्या विद्यार्थिनीला चक्क 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत. याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा कालावधी असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

गुन्हेगारही झाले पास
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याची चर्चा होत असताना आता निकाल जाहीर झाल्यानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसत आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी (Talathi Bharati) पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बऱ्याच मुलांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखवून दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी; अशी मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार आक्रमक
या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गांभिर्याने काम करते; हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा; अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल; अशी मोठी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com