खूशखबर! सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

“बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.” अशी माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

२६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.