Success Story : “ती पास होणार नाही….तिचं लग्न करून टाका…” टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना रोशनीनं दिलं सणसणीत उत्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नातेवाईक पदोपदी (Success Story) हिणवायचे.. म्हणायचे, “आता काही रोशनी पास होणार नाही…” पोलिस भरती परीक्षेत रोशनी एकदा नापास झाल्यानंतर रोशनीच्या आईला त्यांचे नातेवाईक टोमणे मारायचे. “रोशनी आता काही पास होणार नाही, तिचं लवकर लग्न करून टाका. ही शिकून कुठे जाणार आहे? शेवटी तिला भाकरीच थापायची आहे.” नातेवाईक वेळोवेळी तिच्या आईला फुकटचे सल्ले देत होते. त्यामुळे रोशनीच्या आईचं देखील मन चल विचलित होत होतं. पण जेव्हा निकाल हाती आला तेव्हा रोशनीच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कठोर मेहनत घेवून रोशनी पोलिस भरती परीक्षेत पास झाली होती. रोशनीच्या अपयशावरुन तिला आणि कुटुंबाला हिणवणाऱ्या लोकांना तिने आपल्या यशातून सणसणीत उत्तर डायल आहे. जाणून घेवूया तिच्या यशस्वी प्रवासाविषयी…

पोलिस भरतीची परीक्षा देवून पोलिस दलात पद मिळवण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील तरुण-तरुणी पोलिस भरती होण्यासाठी जिवापाड मेहनत (Success Story) घेत असतात. यापैकीच एक आहे 21 वर्षीय तरुणी रोशनी… ती 2 वर्षांपूर्वी मुंबई पोलीस भरतीला गेली आणि अवघ्या 14 मार्काने नापास झाली. मात्र तिने हार मानली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने जळगाव पोलीस भरतीत मुलींमधून चौथ्या क्रमांक पटकावला. अवघ्या 21 व्या वर्षी रोशनी पोलीस दलात भरती झाली आहे. रोशनी आकाश तायडे (Roshni Tayade) असं तिचं संपूर्ण नाव आहे.

वडिल चालवतात चहाची टपरी तर आई करते शेतमजूरी
घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत रोशनी पोलीस दरात भरती झाली आहे. आई-वडिलांना तिचा सार्थ अभिमान वाटतो. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील तायडे कुटुंब. इथे जवळ असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना वसाहतीत ते राहतात. येथे जवळच रोशनीच्या वडिलांची चहाची टपरी आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने टपरीचा व्यवसाय फारसा चांगला होत नाही. जेमतेम घरचा खर्च भागेल एवढाच पैसा या धंद्यातून मिळतो. तिची आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून घरात हातभार लावते. अशा कठीण परिस्थितीत लेकीने पोलीस दलात भरती होवून आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.

पहिल्या प्रयत्नात आलं अपयश (Success Story)
आकाश वामन तायडे, (वय ४२) आणि आई संगीता आकाश तायडे (वय ४०) यांची एकुलती एक मुलगी आहे रोशनी. ती २०२० मध्ये बारावीची परीक्षा पास झाली. त्यानंतर B. Sc प्रथम वर्षाला तिने प्रवेश घेतला. मात्र तिला वेगळं ध्येय गाठायचं होतं. २०२२ ला तिने पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. त्यावेळी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या होत्या. मुंबईत तिचा पहिलाच पेपर होता. त्यावेळी 14 मार्काने रोशनी नापास झाली.

खचून गेलेल्या रोशनीला कुटुंबाने दिली मोलाची साथ
नापास झाल्याने रोशनी पूर्ण खचून गेली होती. मात्र आई-वडिलांनी दिलेली साथ ही तिच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ पासून तिने पुन्हा पोलीस भरतीच्या तयारीला (Success Story) सुरुवात केली. लहान भाऊ केतन तायडे आणि काका संदीप कोळी यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून तिने पुन्हा पोलीस भरतीची तयारी जोमाने सुरू केली. मुंबई पोलीस भरतीच्या पेपरचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून आपण कुठे कमी पडलो याचा मागोवा घेत तिने पुन्हा अभ्यास सुरू केला.

दुसऱ्याच प्रयत्नात बाजी मारली
२०२४ मध्ये जळगाव पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या, त्यावेळी रोशनी तायडेने भरतीसाठी अर्ज केला. दुसऱ्या प्रयत्नातच जळगाव पोलीस दलात तिची निवड झाली. अवघ्या २१ व्या वर्षी (Success Story) पोलीस दलात भरती होणारी ती ग्रामीण भागातील पहिली तरुणी ठरली आहे. वडिलांचे कष्ट, आईने मोलमजुरी करून चालवलेलं घर; या गोष्टींची जाणीव ठेवून रोशनीने कठोर प्रयत्न केले आणि यशाचं शिखर गाठलं. पण आता या पदावर ती समाधानी नसून तिचं पीएसआय (PSI) होण्याचं स्वप्न आहे.

शासकीय नोकरीत दाखल होणारी कुटुंबातील पहिली मुलगी
2022 मध्ये रोशनी मुंबई पोलीस भरतीसाठी गेली, त्यावेळी ती 14 मार्काने नापास झाली होती. घरी आल्यानंतर रोशनी पूर्ण खचलेली होती. मात्र वडिलांनी दिलेला आधार महत्त्वाचा ठरला. १४ मार्काने नापास झाली होती, तरी वडील बाहेर सांगताना माझी मुलगी फक्त २ मार्कांनी नापास झाली आहे असं सांगायचे. वडिलांनी धीर दिला आणि पुढे दुसऱ्या प्रयत्नातच लेक पोलीस दलात भरती झाली. जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्वात जास्त आनंद हा आई-वडिलांना झाला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे थांबत नव्हते. त्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरीत मुलगी पहिल्यांदा दाखल होणार असल्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

“ताई तू पास झालीस”
निकलादिवशी रात्री 11 वाजता वेबसाईटवर रोशनीचा भाऊ केतन तायडेने निकाल पाहिला. त्याने रोशनीला “ताई तू पास झालीस;” असं सांगितलं. रोशनीला भावावर विश्वास बसत नव्हता. मात्र निकाल स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिला विश्वास बसला आणि तिला रडू कोसळलं. आई-वडिलांनाही आनंदाश्रू अनावर झाले. आता आई-वडिलांनी तिला जे शिकायचं असेल, ते शिक्षण पूर्ण कर, त्यानंतरच तुझा लग्नाचा (Success Story) विचार केला जाईल, असं सांगितलं आहे. तसंच वडिलांनी ज्या चहा टपरीच्या धंद्यावर आम्हाला मोठं केलं, ती चहाची टपरी कायम स्मरणात राहील आणि त्या टपरीचं रुपांतर हॉटेलमध्ये केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
पोलिस भरती परीक्षेत रोशनी पहिल्या प्रयत्नात नापास झाली तेव्हा अनेकांनी तिला आणि कुटुंबाला हिणवले. अनेकांनी तिचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. पण रोशनीने कुणाचंही न ऐकता आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आणि पुन्हा परीक्षा दिली. तिने तिच्या मेहनतीतून आपले कर्तुत्व सिद्ध केलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com