Success Story : NRIशी लग्न… 15 दिवसांत मोडला संसार; नोकरी करत दिली UPSC… आज आहे उच्च पदावर

करिअरनामा ऑनलाईन । गुजरातमधील प्रत्येक मुलाला IRS कोमल (Success Story) गणात्रा आणि तिचा संघर्ष माहित आहे. कोमल गणात्रा यांचा जन्म 1982 मध्ये गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला गावात झाला.  त्यांच्या आयुष्यातील एका अपघाताने त्यांचा स्वाभिमान दुखावला होता. मात्र, हार मानण्याऐवजी किंवा कमकुवत होण्याऐवजी त्यांनी कठोर परिश्रम केले आणि संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आपले जीवन घडवले. कोमल यांचं हे यश खचलेल्या अनेक तरुणींसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

वैवाहिक जीवनात असंख्य अडथळे
प्रत्येक यशस्वी कहाणी मागे खूप मोठा संघर्ष लपलेला असतो. मात्र हा संघर्ष अनेकांना दिसत नाही. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत मोठं यश मिळवलं आहे. IRS अधिकारी कोमल गणात्रा यांच्याही मार्गात अनेक अडथळे आले होते. पण त्यांनी हार मानली नाही; त्या लढतच राहिल्या. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असणारी UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या त्या भारतीय महसूल सेवेत (IRS) अधिकारी म्हणून काम करत आहेत.

सुखी संसाराची स्वप्नं भंगली (Success Story)
कोमल गणात्रा यांचं वयाच्या 26 व्या वर्षी लग्न झालं होतं. लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे त्यांनीही सुखी संसाराची स्वप्नं रंगवली होती. पण त्याचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. कारण लग्नाच्या दोन आठवड्यातच त्यांचा पती त्यांना सोडून न्यूझीलंडला निघून गेला. कोमल यांचं एका NRI मुलाशी लग्न झालं होतं. यानंतर मात्र कोमल फार खचल्या होत्या. त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. पण यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना पुढील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.
कोमल यांनी UPSCची तयारी सुरु केली. यावेळीही त्यांच्या वाटेत अडथळे आलेच. एकीकडे भूतकाळ सतावत असताना दुसरीकडे त्यांची UPSC परीक्षेची तयारी सुरु होती. परिक्षेत वारंवार अपयश येत होतं. पण त्यानंतरही त्यांनी प्रयत्न करणं थांबवलं नाही. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली.

‘माझ्या यशात वडिलांचा मोठा वाटा’ (Success Story)
कोमल सांगतात की, “लहानपणासून आमच्या मनात हेच बीज रुजवण्यात आलं होतं की वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचं नाही. वडिलांची शिस्त आणि आईमुळे मिळणारा (Success Story) आत्मविश्वास वेगळाच होता. माझ्या घऱात कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, तू एक खास व्यक्तीमत्व आहेस. तू ठरवलं तर आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे.”

नोकरी करुन परीक्षेसाठी खर्च उभारला
UPSC (UPSC) परीक्षेची तयारी करत असताना कोमल यांनी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून त्यांनी UPSCसाठी येणारा खर्च उचलला आहे. नोकरी करत असताना आलेल्या अनुभवाविषयी कोमल सांगतात; “मी घरापासून 40 कि. मी. अंतरावर असलेल्या एका गावात शिकवण्यासाठी जात होते. मला लोकांकडून कोणताही त्रास झला नाही. उलट मला तिथे मानच मिळत होता. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यासह काही जबाबदाऱ्याही येतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्येयावरुन आपलं लक्ष हटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही भरकटता तेव्हाच समस्या (Success Story) सुरु होतात. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा आपोआप टीका करणाऱ्यांचं तोंड बंद होतं. तुम्ही लक्ष्य समोर ठेवून वाटचाल केली तर यश मिळणार हे नक्की आहे.;”असं कोमल सांगतात.

तरुणांसाठी सल्ला
तरुण पिढीला सल्ला देताना कोमल सांगतात; “आपण पाहतो की अनेक लोक आलेल्या अडचणींवर फक्त रडत असतात. पण त्यावर तोडगा काढत नाहीत. त्यामुळे आयुष्यात अडचण आली तर रडायचं की त्यावर तोडगा काढायचा यावर विचार करा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com