Shikshak Bharti : तब्बल 20 वर्षानंतर पहिल्यांदाच शिक्षकांची 11 हजार पदे भरली; भरतीचा पहिला टप्पा पूर्ण

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक (Shikshak Bharti) भरतीचा पहिला टप्पा रविवारी (दि. 25) रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबवली जात आहे. उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची’ स्थापन करण्यात आली आहे; असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.

या भरतीच्या माध्यमातून पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम 1585, मराठी माध्यम 870, उर्दू माध्यम 640 जागा तसेच इयत्ता सहावी ते आठवी गटातील गणित आणि विज्ञान 2238 रिक्त जागा राहिलेल्या आहेत. पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध नसल्याने दुसरी फेरी घेण्याची गरज पडलेली आहे. आणि मुलाखती शिवाय जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय असलेल्यांना 1189 संस्थांना 4879 रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून 1:10 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातात. मुलाखत आणि अध्यापन कौशल्य याच्या आधारे त्यांची निवड केली जाते यासाठी 30 गुणांची तरतूद केलेली असून उमेदवारांची निवड संस्था करणार आहे.

सूरज मांढरे म्हणाले, शिक्षण विभागातर्फे पूर्णपणे पारदर्शक (Shikshak Bharti) व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले आहे; तर अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या,असे नमूद करून मांढरे म्हणाले, या प्रक्रियेदरम्यान जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून मंत्री शिक्षण व प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे (Shikshak Bharti) प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून सोमवारी निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना असून त्यांनी ती बोलून दाखवली आहे. एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com