भारतीय लष्कराला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; NDA ची परीक्षा देण्यासाठी महिलांना दिली परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अंतरिम आदेश मंजूर करत महिलांना सप्टेंबरमध्ये होणारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएच्या परीक्षेत महिलांना भाग घेऊ न दिल्याबद्दल भारतीय लष्कराला फटकारले.

सैनिक स्कूल आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश न दिल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

वकील कुश कालरा यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुणे स्थित राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि केरळस्थित भारतीय नौदल अकादमी (आयएनए) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना समान संधी मिळावी अशी त्यांची मागणी होती.