NET SET Exam : भावी प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट; ‘सेट’ परीक्षा वर्षातून दोनवेळा होणार

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (NET SET Exam) महत्वाची अपडेट आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ (NET) परीक्षेप्रमाणेच राज्याची ‘SET’ परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांचा आधारे हे नवे बदल अपेक्षीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार आहे.
विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाईन सेटचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे या गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

कधी होणार परीक्षा (NET SET Exam)
परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने सेट परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्षातून दोनदा सेट परीक्षेचे आयोजन करण्याचा विचार आहे.
ही असेल शेवटची ऑफलाईन ‘SET’
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत संभ्रम होता. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले.

परीक्षेतील गोंधळाबाबत विद्यापीठ सावध
विविध ऑनलाईन भरती परीक्षांमधील गोंधळ पाहता विद्यापीठाने (NET SET Exam) सेट परीक्षेसाठी सावध पाऊले उचलली आहे. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी, इंटरनेटची बॅंड विड्थ आणि सुविधांच्या आधारेच ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये, तसेच परीक्षेवेळी गोंधळ होऊ नये म्हणून आधी प्रत्यक्ष चाचणी केल्यानंतर ऑनलाईन सेट परीक्षेचा विचार केला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com