MPSC Update : कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 258 पदांसाठी येत्या 2 ते 3 दिवसात MPSC जाहिरात प्रसिध्द करणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषि सेवेतील (MPSC Update) गट अ, गट ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) संवर्गातील २५८ पदांसाठीची भरतीची जाहिरात येत्या २ ते ३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल; अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश केला जावा यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन छेडले. त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील याबाबत भूमिका मांडली. त्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या सर्व प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

काय होती विद्यार्थ्यांची मागणी?
कृषी सेवा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी होणार्‍या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये 258 पदांची वाढ करावी; अशी मागणी केली होती. विविध राजकीय नेत्यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडली. महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण 258 पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे; अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र, कृषी विभागाकडून मागणीपत्र 16 ऑगस्ट रोजी देण्यात आले. त्यामुळे आयोगाने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.

हाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मांडली भूमिका (MPSC Update)
महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगास दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी शासनाकडून प्राप्त झाले. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे. या परीक्षेसंदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने, सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही, अशी भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मांडली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली आहे. प्रस्तुत (MPSC Update) परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल; असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com