MPSC Success Story : हम पांच!! पाच मित्र.. एकत्र अभ्यास.. अन् मिळवली 10 सरकारी पदे

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात; की चांगल्या (MPSC Success Story) मित्रांची सोबत आपल्याला आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करायला शिकवतात. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या 5 मित्रांनी इतिहास रचला आहे. या मित्रांनी आयुष्यातील प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ दिली. अभ्यासातही त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. योग्य वाट दाखवणारा मित्र जर आयुष्यात लाभला तर माणूस यशाचे शिखर गाठतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे पाच मित्र  आहेत. रात्रीचा दिवस करुन, एकत्र अभ्यास करुन यांनी तरुणाईसमोर आदर्श उभा केला आहे. नेमकं यांनी काय केलं आहे हे आज आपण पाहणार आहोत.

प्रत्येकाने मिळवल्या दोन पोस्ट 
आपल्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार (MPSC Success Story) निकम या मित्रांनी एकत्र कष्ट घेतले आहेत. या पाचही मित्रांनी नाशिकमधील एका अभ्यासिकेत दिवस रात्र एक करून अभ्यास केला; एकमेकांना मार्गदर्शन करत आज या सर्वांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या 5 जणांनी एक नव्हे तर दोन दोन पोस्ट आपल्या खिशात घातल्या आहेत. या पाच मित्रांची सक्सेस स्टोरी वाचलीच पाहिजे…

आकाश दिपक बोढारे (MPSC Success Story)
आकाश दिपक बोढारे हा चांदवड तालुक्यातील शिंदे भयाळे येथील असून त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. आकाश याने 2018 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. या दरम्यान त्याने अनेक परीक्षा दिल्या, यामध्ये कधी पूर्व परिक्षेत तर कधी मुख्य परिक्षेत तो उत्तीर्ण होत असे, पण काही ना काही कारणामुळे यश पदरात पडत नव्हते. यंदा मात्र त्याने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्याची राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांवर निवड झाली आहे.

अनिल भिमराव बत्तीशे
अनिल भिमराव बत्तीशे हा देखील आकाश बोढारेच्या गावचाच असून अनिलने देखील त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे भयाळे येथीलच जनता विद्यालयात पूर्ण केले आहे. त्याने नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. अनिल आणि आकाश या दोघांनी सोबतच अभ्यासाला सुरवात केली. विशेष म्हणजे अनिलने देखील दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्याची पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय क्लर्क या दोन पदांवर निवड झाली आहे.

राहुल नानासाहेब पवार
राहुल नानासाहेब पवार हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथील आहे. राहुलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा करंजगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय करंजगाव येथून पूर्ण केले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण सायखेडा येथील के. के. वाघ येथून पूर्ण केले आहे. राहुलने अभ्यासाची सुरवात दोन वर्षांपूर्वी केली होती. सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राहुलने देखील दोन परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2021 आणि 2023 मध्ये घेतलेल्या परिक्षेत त्याची मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे.

राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम
राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम हे दोन मित्र दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मोहाडी गावातील रहिवासी आहे. या दोघांचे शिक्षण के.आर.टी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे झाले असून ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यातील राकेशने देखील दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण केली असून मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे. तर शुभम नंदकुमार निकम याची मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. या पाचही मित्रांवर कौतुकाचा वर्षाव होत असून मित्र सोबत असले तर माणूस कोणत्याही संकटाचा अडथळा यशस्वी पार करू शकतो; हे सिध्द झालं आहे.

आपण मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना हे मित्र सांगतात; आम्ही 2018 पासून अभ्यास करत आलो आहोत. मात्र काही काळ कोरोनाने हाहाकार माजवला. यामुळे आम्ही सर्वजण आपआपल्या घरी गेलो. 2021 वर्ष जसजसं संपत आलं तसतसा कोरोनाचा प्रभावही कमी झाला आणि आम्ही (MPSC Success Story) सर्व मित्रांनी अभ्यासासाठी पुन्हा नाशिक गाठले आणि गंगापूर रोडवर अभ्यासिकेत पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. आम्ही सर्व एकत्र अभ्यास करत होतो, एकमेकांच्या अभ्यासातील अडीअडचणी शंका सर्वजण सोबत बसून सोडवत होतो. त्याचाच फायदा आम्हाला 2022 आणि 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत झाला. अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत आम्ही पाचही मित्र वेगवेगळ्या पदांवर उत्तीर्ण झालो. आम्हाला पास होणार हा आत्मविश्वास होताच, तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. आज आम्ही पाच जणांनी वेगवगेळ्या पोस्ट मिळवल्या आहेत. सर्वांनी एकत्र केलेल्या प्रयत्नामुळे आपल्या आयुष्यात योग्य मित्र भेटणं किती महत्वाचं आहे; हे सिध्द झालं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com