MPSC Result 2022 : एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोण ठरलं अव्वल??

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Result 2022) राज्य सेवा मुख्य परीक्षा-2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता  यादी जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार विनायक नंदकुमार पाटील हा विद्यार्थी राज्यातून पहिला आला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 चा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केला आहे.

623 उमेदवार शिफारसपात्र
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर 30 नोव्हेंबर 2023 ते 18 जानेवारी, 2024 दरम्यान पार पडल्या. यानंतर अवघ्या काही तासातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता 623 उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.

विनायक पाटील, पूजा वंजारी यांनी मारली बाजी (MPSC Result 2022)
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या सामान्य गुणवत्ता यादीनुसार राज्यात विनायक नंदकुमार पाटील हा पहिल्या स्थानी असून, धनंजय वसंत बांगर हा दुसऱ्या स्थानी तर सौरभ केशवराव गावंडे ह्याने तिसरे स्थान पटकावले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी या विद्यार्थिनीने पहिले स्थान पटकावले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या यादीत एकूण 1830 विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत जाहीर करण्यात आली आहेत.

आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली गुणवत्ता यादी ही (MPSC Result 2022) तात्पुरत्या स्वरूपाची असून, अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत बदल होऊ शकतो. जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत त्यांनी आवडत्या पदासाठी पसंती जाहीर करायची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 22 जानेवारी 2024 पासून ते 29 जानेवारी 2024 पर्यंत आयोगाच्या वेबसाईटवर आवेदन करता येईल. आयोगातर्फे घेण्यात आलेली ही परीक्षा केवळ 23 विविध पदांसाठी घेण्यात आली होती.
पसंती जाहीर करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास आयोगाने जाहीर केलेल्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या फोन क्रमांकावर किंवा आयोगाच्या संकेतस्थळावर [email protected] संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com