मराठा आरक्षणासाठी उद्या दोन्ही छत्रपती एकाच स्टेजवर; MPSC परिक्षेला स्थगिती मिळणार?

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

नरेंद्र पाटील म्हणतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आमच्या बऱ्याच संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. एक बैठक आमची छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये झाली. कोल्हापूरमध्येही आमच्या भाऊबंधांनी बैठक घेतली. पुण्यात आमदार विनायक मेटेंनी बैठक घेतली. त्या बैठकीला छत्रपती उदयनराजे जाणार असं समजलं. 1980ला माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी मागणी केली होती. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विदर्भातील शेतकरी आरक्षणापासून वंचित राहत होता. पण आता तसं होऊ देणार नसल्याचंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल. जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला अन्यथा..
दोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही. एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे. उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे. त्यामुळं राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा स्थगित करावी किंवा पुढे ढकलावी. अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.