Maharashtra News : कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?? शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत… पहिलीच्या मुलांना शिकवतात चौथीचे विद्यार्थी

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांवर शिकवण्याच्या जबाबदारी (Maharashtra News) पलीकडे अतिरिक्त कामाचा ताण असल्याचं आपण नेहमीच पाहतो. त्यात भर पडली आहे निरक्षरांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची. दि. 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या अभियानात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरु असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून सर्व शिक्षक या अभियानात व्यस्त असल्याचं पहायला मिळत आहे.

या साक्षरता अभियान सर्वेक्षणामुळे चांदूर तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क चौथ्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे गावात सर्वेक्षणाकरता (Maharashtra News) जात असल्याचे चौथीचे विद्यार्थी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने शिक्षकांना हे काम करावं लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

“मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं असून तो पहिलीच्या वर्गात शिकत आहे. घराजवळच शाळा असल्याने मला मुलांचा आवाज येत होता त्यामुळे मी आत जाऊन पाहिलं. पाहतो तर काय… चौथीच्या वर्गातील मुलगी पहिलीच्या मुलांना शिकवत होती. याबाबत शिक्षकांना विचारले असता त्यांनी सांगितले की साक्षरता अभियान सुरु असल्याने सर्व शिक्षिका साक्षरता सर्वेसाठी गावात गेल्या आहेत. सरांनी एक दोन तासांसाठी असे शिकवण्यास सांगितले आहे. वारिष्ठांचा दबाव असल्यामुळे आम्हाला हे सगळं काम लवकरात लवकर पूर्ण करुन द्यायचं आहे;” अशी माहिती पालक अफसर पठाण यांनी दिली.
दरम्यान, देशात नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत 15 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात दि. 17 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमातून राज्यात 2023-24 मध्ये 12 लाख 40 हजार निरक्षर नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपल्बध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या कालावधीतच शाळाबाह्य (Maharashtra News) विद्यार्थी शोधमोहीमही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा हे युनिट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वॉर्ड अशा ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये निरक्षरांचे नाव, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाणार आहे.

शिक्षकांना घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागणार आहे. पण प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. शिक्षक जर सरकारी अतिरिक्त कामात गुंतून राहिले तर मुलांच्या शिक्षणाचं काय? ज्या वयात नवीन पिढी घडत असते त्या वयात जर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं तर त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर शासनाने शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करणं गरजेचं आहे; अशी मागणी पालक करत आहेत. आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी सतावणाऱ्या संतप्त पालकांमधून एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com