Job in Maharashtra : महाराष्ट्रात ‘इतक्या’ तरुणांना मिळाला रोजगार; तुम्हालाही होईल फायदा; इथे नोंदवा तुमचं नाव

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचं संकट (Job in Maharashtra) वाढत असताना दुसरीकडे रोजगाराबाबत दिलासा देणारी बातमी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग धंद्यामध्ये 31 मे 2023 अखेर राज्यातील 88 हजार 108  उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल या विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.

बेरोजगार तरुण आणि उद्योजकांसाठी सुरु आहे वेबपोर्टल (Job in Maharashtra)
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी शासनाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर (Job in Maharashtra) नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यात आतापर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन 104 रोजगार मेऴाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छुक उमेदवारांचा मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन सत्र आयोजित केले असून यामध्ये 84 हजार 890 उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घेतला आहे; अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध
विभागाकडे तसेच महास्वयम वेबपोर्टलवर आतापर्यंत 1 लाख 4 हजार 695 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक (Job in Maharashtra) आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे या उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

इतक्या उमेदवारांनी केली नोंदणी
यामध्ये मुंबई विभागात 10 लाख 37 हजार 747, नाशिक विभागात 9 लाख 47 हजार 786, अमरावती विभागात 6 लाख 35 हजार 920,औरंगाबाद विभागात 12 लाख 5 हजार 687, नागपूर विभागात 8 लाख 51 हजार 301 तर पुणे विभागात 14 लाख 27 हजार 617 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. (Job in Maharashtra)

इतक्या जणांना मिळाली नोकरी
आतापर्यंत कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे मुंबई विभागात 23 हजार 634, नाशिक विभागात 14 हजार 211, अमरावती विभागात 3 हजार 367,औरंगाबाद विभागात 17 हजार 451, नागपूर विभागात 1 हजार 165 ,पुणे विभागात 28 हजार 280 बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली आहे.
इथे करा नांव नोंदणी
राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com