उद्या होणार राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Udhhav Thackeray
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरोना घटनांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. गेले काही महिने सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तारीख पुढे गेल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले आणि आंदोलनाला बसले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह करत परीक्षा फार पुढे ढकलण्यात आल्या नसून उद्याच पुढची तारीख जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले. याबरोबरच परीक्षा पुढच्या आठवड्यातच होतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लाईव्ह संवाद | Udhhav Thackeray | MPSC Prelims Exam Postponed

परीक्षा पुढे ढकलण्याचे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी सांगितले, “या परीक्षांकरिता शासकीय अधिकारी यांची देखील भूमिका असते. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बरेचसे शासकीय अधिकारी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये व्यस्त आहेत. त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेता परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे म्हणूनच या सर्वांचे योग्य नियोजन करून १४ तारखेनंतरच्या पुढच्या आठवड्यातच परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घेतल्या जातील” राज्यातील विद्यार्थ्यांची काळजी मी समजू शकतो, आणि आम्ही त्यांचा पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेत आहोत असेही ते म्हणाले.

परीक्षांच्या तारखांवरून राज्यातील विदयार्थ्यांना भडकवले जात आहे. अशा अफवांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दिवसभरात राज्यात प्रचंड असांतोष पसरविण्याचा प्रयत्न केला गेला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील बिघडलेले वातावरण लक्षात घेऊन दर रविवारी होणारा हा संवाद असा आठवड्याच्या मधल्या दिवशी घेतो आहे असेही ते म्हणाले. सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने असणार आहे तसेच परीक्षेसाठी असणाऱ्या वयोमर्यादेचा देखील विचार करून आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.