UPSC Success Story : पास होण्याची खात्री होती पण पहिला नंबर येणं अनपेक्षितच!! वाचा UPSC Topper श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल (UPSC Success Story) जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चारही क्रमांकावर यंदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुतीनंतर दुसर्‍या क्रमांकावर अंकिता अग्रवाल, तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला, तर चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या शर्मा आहे. यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. यंदाची टॉपर ठरलेली श्रुती शर्मा कोण आहे, तिने कुठून शिक्षण घेतलं आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊया श्रुतीच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…

कोण आहे श्रुती शर्मा? –

  • श्रुतीचा जन्म १९९७ मध्ये उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे झाला.
  • तिच्या आईचे नाव रचना शर्मा तर वडिलांचे नाव सुनील शर्मा आहे.
  • श्रुतीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे.
  • श्रुती शर्माने केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे.
  • श्रुती शर्मा ही उत्तर प्रदेशच्या बिजनौरची रहिवासी आहे.
  • तिने दिल्लीमधील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं.
  • इतिहास विषयात तिने पदवी घेतली आहे.
  • दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (JNU) आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
  • श्रुती शर्मा दोन वर्षांपासून जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमधून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होती.

“पहिला क्रमांक येणं माझ्यासाठी अनपेक्षित”…

निकाल घोषित झाल्यानंतर श्रुतीने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं. ती म्हणाली, की या वर्षी ती परीक्षेत पास होईल याबद्दल तिला खात्री होती; मात्र थेट पहिला क्रमांक येईल हे आपल्याला अनपेक्षित होतं असं तिने सांगितलं. या परीक्षेत ऑल इंडिया फर्स्ट रँक मिळवणाऱ्या श्रुतीला आयएएस व्हायचं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचं तिचं स्वप्न आहे.

पहिल्या पाचमध्ये चार मुली (UPSC Success Story)

यंदाच्या टॉपर्समध्ये पहिल्या पाचात चार मुलींचा समावेश आहे. पाचव्या क्रमांकावर उत्कर्ष द्विवेदी, सहाव्या क्रमांकावर यक्ष चौधरी, सातव्या क्रमांकावर सम्यक जैन, आठव्या क्रमांकावर इशिता राठी, नवव्या क्रमांकावर प्रीतम कुमार, तर दहाव्या क्रमांकावर हरकीरत सिंह रंधावा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुण्याच्या शुभम भिसारे याने 97वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारे याने 203वा, ईशान टिपणीस याने 248वा, तर रोशन देशमुख आणि अश्विन गोळपकरने अनुक्रमे 451 आणि 626 वा क्रमांक पटकावला आहे.

श्रुती कोणाला देते यशाचे श्रेय

श्रुतीचे कुटुंब दिल्लीच्या पूर्व कैलास भागात राहते. ती मूळची उत्तर प्रदेशातील बिजनौरची आहे. श्रुतीला तिच्या यशाचे श्रेय तिच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येकाला द्यायचे आहे. या यशाचे श्रेय ती तिचे कुटुंबीय, आई-वडील, मित्रमंडळी, जामियाचे कोचिंग आणि तिने शिक्षण घेतलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांनाही देते.

शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याची इच्छा

श्रुतीने UPSC परीक्षेत पहिलं स्थान मिळवत आपला (UPSC Success Story) दबदबा कायम ठेवलाय. आता ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पोस्टिंग मिळेल हे निश्चित आहे. तिच्या भविष्यातील योजनांविषयी विचारले असता ती सांगते, “माझ्यावर दिलेली कोणतीही जबाबदारी मी स्वीकारेन, पण शिक्षण आणि महिला सक्षमीकरण ही माझी वैयक्तिक आवड आहे. त्यामुळे या विभागासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.”

तयारीच्या या प्रवासात संयम आवश्यक

आपल्या यशाचा कोणताही खास मंत्र तिने सांगितला नाही, पण UPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी ती सांगते: “कोणी किती तास अभ्यास करत आहे याने काही फरक पडत नाही, तर तो किंवा ती किती मेहनतीने अभ्यास करतोय हे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते.अभ्यास करण्यासाठी रणनीती बनवणे आवश्यक आहे. यासोबतच नोट्स बनवणे, त्यांची पुनरावृत्ती करणे याशिवाय मानसिक एकाग्रता आवश्यक आहे. तयारीच्या या प्रवासात संयम आवश्यक आहे. प्रशासकीय सेवेमध्ये काम करायचे आहे हि गोष्ट जोपर्यंत तुमच्या आतून येत नाही, तोपर्यंत हा प्रवास तुमच्यासाठी अवघड आहे. ज्यावेळी तुमचे अंतर्मन तुम्हाला उत्तर देईल तेव्हा या क्षेत्रात तुम्ही नक्कीच चमकाल.”

“सर्वात आधी आई आणि आजीला निकाल सांगितला”

“निकाल लागण्यापूर्वी घरात दोन दिवस निकालाचीच चर्चा होती. श्रुती सांगते की जेव्हा परीक्षेचा निकाल आला तेव्हा आई आणि आजी घरी होत्या त्यांनाच सर्वप्रथम निकाल सांगितला. वडिलांना फोनवर निकालाबाबत बातमी दिली. निकाल ऐकून घरातले सर्वजण आनंदात होते. प्रत्येकजण भावूक झाला आणि मला हा आनंद पाहून खूप आनंद झाला.”

“UPSC ची तयारी करणाऱ्यांना धीर धरावा लागेल”

श्रुती सांगते की, UPSCचा अभ्यासक्रम मोठा आहे, त्यामुळे बाजारात जी काही पुस्तके मिळतात ती पुस्तके प्रत्येकजण आणतो. पुस्तकांबरोबर स्वत: नोट्स तयार करून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नोट्स काढण्यावर भर द्या, असं श्रुती सांगते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com