UPSC Success Story : “तरूणांनो.. राजकारण आणि क्रिकेटच्या मागे न धावता ध्येयावर लक्ष केंद्रीत करा”; सांगत आहे 7 वेळा नापास झालेला अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर (UPSC Success Story) झाला आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांपैकी अनेकजण घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत; तर काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते, मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे. कर्नाटकमध्ये असाच एक होतकरू उमेदवार आहे. ज्याच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. पोलीस उपनिरीक्षक शांताप्पा के. (Shantappa K) उर्फ शांताप्पा जादमानवर असं त्याचं नाव आहे. यूपीएससीत (UPSC) तब्बल सात वेळा अपयशी झाल्यानंतर आठव्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली आहे. जाणून घेवूया त्याच्या जीवन प्रवासाविषयी….

लहानपणी हरपलं वडिलांचं छत्र
शांताप्पा अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं. त्यानंतर त्यांच्या आईने शांतप्पांचं पालनपोषण करण्यासाठी इतरांच्या शेतात मोलमजुरी केली. शांताप्पा पदवी परीक्षेत चार विषयांमध्ये नापास झाले होते. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून हा तरूण पुढे यूपीएससीसारख्या परीक्षेत (UPSC Success Story) बाजी मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र शांताप्पा यांनी प्रचंड मेहनतीने यूपीएससी परिक्षेत यश मिळवलंच. एक-दोन नव्हे तर सात वेळा अपयश आल्यावरही शांताप्पांनी हार मानली नाही, त्यांचं मनोबल खचलं नाही. यावर्षी त्याने आठव्यांदा प्रयत्न केला आणि या परीक्षेत संपूर्ण भारतातून ६४४ वी रॅंक मिळवली. या कामगिरीने त्याच्या कुटुंबाच्या आणि सहकाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

शिक्षणात प्रगती कशी झाली..
शांताप्पा अभ्यासात फार हुशार नव्हता. त्याची आई मोलमजुरी करून घराचा आर्थिक गाडा ओढत होती. शांताप्पाची शाळा-महाविद्यालयात जेमतेम प्रगती चालू होती. कॉलेजमध्ये शिकत (UPSC Success Story) असताना तो नापास झाला होता. यानंतर दिलेल्या परीक्षेत त्याला अवघे ३९ टक्के मार्क मिळाले. शांताप्पा सांगतात; “माझी शिक्षणातील प्रगती पाहून माझ्या कॉलेजमधील आणि गावातील मित्रांचं माझ्याबरोबरचं वागणं बदललं. त्यामुळे मला समजलं की शिक्षणाशिवाय या जगात आपल्याला काहीच किंमत मिळणार नाही. यामुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. मी वीरशैव महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.”

एकीकडे ड्यूटी आणि दुसरीकडे अभ्यास
यूपीएससीच्या तयारीसाठी शांताप्पा दिल्लीला गेला. तिथे त्याने एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. इथून पुढचा मार्ग सोपा नव्हता. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ सात वेळा परीक्षा दिली. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश आलं. दरम्यान, सुरुवातीच्या काळात यूपीएससीत अपयश आल्यानंतर त्याने दुसऱ्या बाजूला पोलीस होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिथे मात्र त्याला यश पहायला मिळालं. २०१६ मध्ये हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला. पोलीस झाल्यानंतरही त्याने या पदावर समाधान न मानता यूपीएससीचा अभ्यास चालूच ठेवला. त्याची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली होत होती. पोलीस खात्यात काम करताना तो आपली जबाबदारी चोख पार पाडत होता. नोकरी करत असताना यूपीएससीची तयारी त्याने सोडली नाही. एकीकडे ड्यूटी आणि दुसरीकडे अभ्यास; अशी त्याची तारेवरची कसरत सुरू होती. सलग सात अपयश पचवणाऱ्या शांताप्पा याने अखेर यावर्षी यूपीएससीत यश खेचून आणलं. त्याने संपूर्ण देशातून 644 वा क्रमांक मिळवला आहे.

पोलीस उपिरीक्षक शांताप्पा बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहे. शांताप्पाने मिळवलेली यूपीएससी रँक पाहता त्याची आयपीएस (IPS) किंवा आयआरएस (IRS) अधिकारी पदावर नेमणूक होऊ शकते. शांताप्पाला आणि त्याच्या कुटुंबाला आयुष्यात खूप संघर्ष पहावा लागला आहे. बेल्लारी जिल्ह्यातील होसा जेनिकेहल गावातून आलेल्या या तरुणाचं बालपण हलाखीत गेलं. वडील गेल्यानंतर त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र आईने काबाडकष्ट करून मुलाला वाढवलं, शिकवलं आणि पोलीस उपनिरीक्षक केलं.

तरुणांना दिला हा सल्ला (UPSC Success Story)
अतूट दृढ निश्चयाच्या जोरावर शांताप्पाने हे यश खेचून आणलं आहे. आपल्या देशातील तरुणांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर तो सांगतो; “मी तरुणांना एवढंच सांगेन की शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. मला वाटतं, आपल्या देशातील तरुणांनी क्रिकेट किंवा राजकारणामागे धावून बहुमोल वेळ आणि आयुष्य वाया घालवू नये. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com