UPSC Success Story : हार मानू नका.. यश मिळतंच!! वाचा.. UPSC मध्ये शेवटून पहिला आलेल्या महेश कुमारची कहाणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या (UPSC Success Story) नावाची चर्चा नेहमीच हॉट असते. UPSC असो की MPSC.. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला की टॉपर्सच्या यादीत पहिल्या 10 क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळेच डोक्यावर घेतात. यावर्षीचा UPSC चा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. यामध्ये संपूर्ण भारतातून 1016 उमेदवारांनी यश मिळवलं आहे. टॉपर्सचा कौतुक सोहळा सगळ्यांनीच पाहिला पण UPSCची यादी ज्या नावाने पूर्ण होते ते नावही आता चर्चेत आलं आहे. ते नाव आहे यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिले स्थान मिळवलेल्या म्हणजेच या यादीत 1016 व्या क्रमांकाने पास झालेल्या महेश कुमार (Mahesh Kumar) यांचे. महेश कुमार यांनी परिस्थितीशी लढा देत वयाच्या 42 व्या वर्षी हे यश मिळवलं आहे.

11 वर्षांनी झाले 12 वी पास (UPSC Success Story)
महेश कुमार हे 1995 साली दहावी पास झाले. त्यांच्या शाळेत ते पहिले आले होते. पण घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली आणि पैसे कमवण्यासाठी काम करावे लागले. पण शिक्षणाचा ध्यास असलेल्या महेश कुमार यांनी 11 वर्षांनंतर म्हणजे 2008 साली 12 वीची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. 2011 साली त्यांनी पदवी घेतली आणि 2013 साली टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होऊन ते कंत्राटी पदावर शिक्षक बनले.

दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश
महेश कुमार हे मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी आहेत. ते सध्या (UPSC Success Story) शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात. महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या वकिलांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. महेश कुमार यांचा हा UPSC परीक्षा देण्याचा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर महेश कुमार यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आहे.

वडील गावोगावी फिरून तांदूळ आणि डाळ विकायचे
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील तु्र्की खराट या गावात (UPSC Success Story) महेश कुमार हे आपल्या परिवारासह राहतात. कधीकाळी हा परिसर नक्षलवादी कारवायांनी प्रभावित होता. महेश कुमार यांचे वडील हे गावोगावी भटकून तांदूळ आणि डाळ विकायचे; आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.

अधिकारी होण्याच्या ध्यासामुळे यश मिळाले
महेश कुमार यांनी 2018 साली कोर्टाची परीक्षा दिली आणि क्लर्क म्हणून काम सुरू केलं. 2023 साली त्यांनी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी (UPSC Success Story) स्वीकारली. नोकरी करत असताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा ध्यास काही सोडला नाही. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससीचा अभ्यास कायम ठेवला आणि अखेर त्याचं फळ त्यांना मिळालं. कितीही संकटं आली, कितीही संघर्ष वाट्याला आला तरी जिद्द न सोडता सातत्याने काम करत राहिल्यास यश मिळतंच हे महेश यांनी वयाच्या 42 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास होऊन सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांच्यामधील ही जिद्द प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारी ठरत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com