करिअरनामा ऑनलाईन । काही व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्षाच्या (UPSC Success Story) कथा हृदयाला भिडतात आणि त्यांच्यातील अनेक कलागुणांना सलाम करण्यासाठी हात आपोआप वर जातात. अशीच एक गोष्ट आहे बिहारमधील एका छोट्या गावात वाढलेल्या नवनीत आनंदची (IPS Navneet Anand) . हा तरुण वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी प्रथम CISF मध्ये असिस्टंट कमांडंट झाला आणि नंतर वयाच्या 23 व्या वर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झाला. बिहारमधील हरभंगा या छोट्याशा गावातून आलेल्या या तरुणाचा देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेवूया…
गावखेड्यातून आलेला तरुण
नवनीत आनंद हा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हरभंगा या छोट्याशा गावातील तरुण आहे. त्याने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशातील दोन मोठ्या भरती परीक्षा पास केल्या आहेत. सर्वप्रथम त्याने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी सीआयएसएफमध्ये (CISF) असिस्टंट कमांडंट पद मिळवले. यानंतर त्याने 2023 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी तिसऱ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली. यामध्ये नवनीतने AIR 499 मिळवली आहे. हा निकाल जाहीर झाला तेव्हा नवनीत असिस्टंट कमांडंटचे प्रशिक्षण घेत होता.
सैनिक स्कूलमध्ये घेतले शालेय शिक्षण (UPSC Success Story)
नवनीत आनंद याच्या कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी लाभली आहे. असे असतानाही त्याच्या पालकांनी तो इयत्ता 3 री मध्ये असताना त्याला सैनिक स्कूल, चित्तौडगड, राजस्थान येथे शिकण्यासाठी पाठवले. नवनीतने सांगितले की, “मी येथे आठ वर्षे शिक्षण घेतले. या शाळेने माझे व्यक्तिमत्व वाढवले. मी आज जे काही आहे यामध्ये सैनिक स्कूल चित्तौडगडची महत्त्वाची भूमिका आहे.”
अपघातात वडिलांना गमावलं पण आईसाठी काहीतरी करण्याची जिद्द कायम
नवनीतचे बालपण तसे चांगले गेले; पण तो इयत्ता 7 वीत शिकत असताना एक शोकांतिका घडली ज्यामुळे त्याच्या आयुष्यात बरेच बदल झाले. रस्ते अपघातात त्याने त्याच्या वडिलांना गमावलं. या धक्कादायक प्रकारानंतर कौटुंबिक जबाबदारीचा भार त्याच्या आईच्या खांद्यावर आला. नवनीतने त्याच्या आईला आर्थिक (UPSC Success Story) अडचणींशी झुंजताना आणि लोकांच्या असंवेदनशील टोमण्यांचा सामना करताना पाहिले आहे. हे सर्व चित्र पाहून त्याच्या मनात आईसाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली.
सरकारी भरती परीक्षांची तयारी सुरू केली
नवनीतचे स्वप्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत जाण्याचे होते. पण मायोपियामुळे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. खचून न जाता त्याने वेगळी रणनीती आखली आणि दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली आणि इतर सरकारी भरती परीक्षांची सुध्दा तयारी सुरू केली.
तणावमुक्त राहण्यासाठी धरली बास्केटबॉल आणि पेंटिंगची साथ
नवनीत राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे. अभ्यासासोबतच नवनीतला पेंटिंग आणि बास्केटबॉल खेळण्याचीही आवड आहे. तो रोज किमान दोन-तीन तास वाचनालयात अभ्यास करत असे. बास्केटबॉल आणि पेंटिंग हे त्याच्यासाठी तणाव दूर करणाऱ्या थेरपीसारखे आहेत. स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी तो या दोन गोष्टी करतोच.
तिसऱ्या प्रयत्नात झाला IPS (UPSC Success Story)
नवनीतने 2021 मध्ये पहिल्यांदा आणि 2022 मध्ये दुसऱ्यांदा UPSC नागरी सेवा परीक्षा दिली. दोन्ही वेळेस त्याला पूर्व परीक्षा पास करता आली नाही. पण या अपयशाला त्याने स्वतःवर वर्चस्व गाजवू दिले नाही. नवनीतने CDS, UGC NET JRF आणि सर्वात महत्वाचे म्हणजे UPSC CAPF असिस्टंट कमांडंट भरती परीक्षा पास केली. ज्यामध्ये त्याने 37 वा क्रमांक मिळवला होता. त्याच्या या बॅकअप योजनेमुळे त्याला कोणत्याही दबावाशिवाय तयारी करण्यात खूप मदत झाली आणि अखेर UPSC पास होवून अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com