UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या शामलने नशिबाला झुकवून हवं ते मिळवलं आहे. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ नाकारत तिने बंड केलं आणि आता ती थेट आयएएस (IAS) झाली आहे. नुकतंच यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या 24 व्या वर्षी शामल भगत हिने देशात 258 वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

सर्वकाही नशिबावर अवलंबून आहे असं म्हणणाऱ्या तरुण पिढीसाठी शामल भगत एक मोठं उदाहरण आहे. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपलं नशिब बदलू शकतो हाच संदेश तिने युवक-युवतींना दिला आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवसाविषयी….

परीक्षेत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही (UPSC Success Story)
शामलच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची. तिचे इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर शेजारच्या निरनिमगावात माध्यमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच हुशार असलेली शामलने दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयातून तिने B.Sc. Agri पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठातून सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

लग्नासाठी आलेलं स्थळ धुडकावलं
विशेष म्हणजे दहावी झाल्यानंतर शामलपुढे तिच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण शामलने लग्नाला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला. थोडक्यात शामलने बंड करुन लग्न करणे नाकारले आणि आपला मोर्चा अभ्यासाकडे वळवला.

दुसऱ्या प्रयत्नात पास केली परीक्षा
शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासूनच उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा निर्धार केला होता. पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश मिळालं नाही. मग दुसऱ्यावेळी तिने (UPSC Success Story) प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर तिने काम केलं आणि दुसऱ्याच प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली.

आईचं कर्करोगानं निधन
शामलच्या UPSC मुलाखतीच्या तारखा समोर असताना आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्या वाटेवर (UPSC Success Story) सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय तिला उपयोगी ठरली त्यामुळे शामल या दुःखातूनही सावरली आणि हिंमतीने मुलाखतीला सामोरी गेली.

विना कोचिंग घेता क्रॅक केली परीक्षा (UPSC Success Story)
यूपीएससीचा (UPSC) निकाल लागला आणि शामल संपूर्ण देशात 258 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शामलने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात उंचावलं. तिच्या यशात कुटुंबीय आणि भावंडांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण भागातली मुलगी, कोणताही क्लास न लावता यूपीएससीसारखी परीक्षा यशस्वी झाली आहे; त्यामुळे शामलचं हे यश अधोरेखीत झालं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com