करिअरनामा ऑनलाईन । लघिमाने तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तिने परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) उत्तीर्ण होण्याची कल्पनाही केली नव्हती. ती म्हणते; “ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर माझे पालकही भावूक झाले. त्याहीपेक्षा, मी रिलॅक्स झाले आहे कारण मला आता एकामागोमाग एक प्रिलिम्स परीक्षा देण्याची गरज नाही.”
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या लघिमा तिवारीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 19 मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी केली. ती मूळची राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे पण तिच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे दिल्लीत गेली आहेत.
अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली
कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना लघिमा असा सल्ला देते, की “उमेदवारांनी कमी तास अभ्यास केला तरी न चुकता दररोज, सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरी ते निर्विवादपणे परिक्षेत चांगला निकाल मिळवू शकतात. याउलट, दिवसातून 10-12 तास अभ्यास करणे आणि दुसऱ्या दिवशी अजिबात अभ्यास न करणे हे योग्य नाही. सातत्याने केलेलं कोणतंही काम दीर्घकाळात सकारात्मक परिणाम देतात.”
एक वर्ष केला सखोल अभ्यास (UPSC Success Story)
2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लघिमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. एका वर्षाच्या कालावधीत, तिने सखोल अभ्यास केला आणि YouTube वर टॉपर्सच्या मुलाखतींमधून प्रेरणा घेत तिची रणनीती संकलित केली. ती सांगते; “मला तयारीसाठी एक वर्ष लागले, ज्यामध्ये मी सर्व स्थिर भाग, मूलभूत जीएस आणि चालू घडामोडींच्या अभ्यासाचा समावेश केला आणि त्यामुळे मी आज हे यश मिळवू शकले आहे.”
कोचिंग क्लासला गेली नाही
इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासात जीवशास्त्र विषयाची पार्श्वभूमी असलेल्या, लघिमाने UPSC मुख्य परीक्षेसाठी तिचा पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र निवडले. केवळ टेस्ट मालिका आणि स्वयं-अभ्यासावर अवलंबून राहून तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पहिल्याच प्रयत्नात परीक्षेचे सर्व स्तर पार केले.
पालकांना देते यशाचे सर्व श्रेय
लघिमाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या पालकांना देते. नागरी सेवांमध्ये करिअर करणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे. तिने सुरुवातीपासूनच सकारात्मक मानसिकता ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे तिला परीक्षेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत झाल्याचे ती सांगते.
विद्यार्थ्यांना सांगते.. अशी ठेवा अभ्यासाची रणनिती
लघिमा सांगते; “UPSC देणाऱ्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच (UPSC Success Story) योग्य रणनिती आखली पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन त्याचे सातत्याने पालन करणे महत्त्वाचे आहे. सततचे प्रयत्न आणि उजळणी हीच परीक्षेत यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. मॉक टेस्ट द्या आणि त्यामध्ये झालेल्या चुकांमधून शिका. पूर्व परीक्षा झाल्या नंतर वेळ वाया घालवू नका. तुम्हाला कितीही आत्मविश्वास असला तरी लगेचच मुख्य परीक्षेची तयारी सुरु करा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com