करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला (Teachers Recruitment) पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. राज्यात २०१८ मध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुरु झाली होती. या माध्यमातून १९६ संस्थांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थांकडून दि. १८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे; अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
२०१८मध्ये पवित्र पोर्टलमार्फत १२ हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला यामध्ये सहा ते सात हजार पदांची भरती करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही प्रक्रिया रखडली. आता पुन्हा ३० हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा (Teachers Recruitment) शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याबरोबरच रखडलेल्या भरती प्रक्रियेतील १९६ संस्थांतील ७६३ रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया होणार आहे.
मुलाखतीसह पदभरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या संस्थांपैकी ज्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये खुल्या (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा उर्वरित १९६ संस्थांसाठी एसईबीसी प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यात ६ वी ते १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही (Teachers Recruitment) करण्यात येत आहे. या संस्थांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी या पूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेसाठी दहा उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
त्यासाठी ७६३ पदांवर निवडीसाठी एकूण ५ हजार ५३५ प्राधान्यक्रमावर उमेदवारांची शिफारस झाली आहे. मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय आणि आरक्षण विचारात घेऊन संस्थांकडून निवड केली जाईल. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यातून निवड होऊन शाळेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com