करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 54 अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 550 शिक्षकांची भरती होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावली तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करुन घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये 687 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबर अखेर रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरुन घेतले जाणार आहेत. गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील.
शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने केले मोठे बदल (Teachers Recruitment)
1. नोंदणीकृत उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. वशिलेबाजी, डोनेशन अशा गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने हे बदल केले आहेत.
2. खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक भरतीची पद्धती आता बदलली आहे. आता ज्या खासगी अनुदानित शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संबंधित शाळांमध्ये पाठविले जातील.
3. या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी, एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करुन आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण असेल.
जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त आहेत. त्यांची संख्या 84 असून कोणत्या संस्थांमध्ये कोणत्या विषयांचे शिक्षक रिक्त आहेत याची माहिती (Teachers Recruitment) घेतली जात आहे. नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी दिली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्तपद कमी केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com