करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील गुणांनुसार भरती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा शासनाचा विचार
राज्यभरात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा शासनाचा विचार आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्यातील शिक्षकांच्या नेमणुका देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत.
पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती (Teachers Recruitment)
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह बिगर इंग्रजी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांवर इंग्रजी माध्यमातून डी. एड्. धारकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविका असणार्या मुलांना विशेष सवलत दिली जाणार असल्याचे पत्रकसुद्धा काढण्यात आले. या निर्णयामुळे मराठी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका घेतलेल्या उमेदवारांवर अन्याय ठरणार आहे.
मराठी माध्यमाचा शिक्षक इंग्रजीमधून शिकवण्यास सक्षम
हे पत्रक 2013 च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन काढण्यात आले (Teachers Recruitment) असून सुधारित 2018 च्या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सुधारीत 2018 च्या GR नुसार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची आवश्यकता नाही. मराठी माध्यमाचा शिक्षक इंग्रजीमधून शिकवण्यास सक्षम आहे; असे त्यात स्पष्ट नमूद केले आहे. असे असताना इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना ही विशेष सवलत देणे योग्य नाही.
हा तर न्यायालयाचा अवमान
मुळातच इंग्रजी माध्यमाच्या मुलांची संख्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी आहे. न्यायालयाने नुकतेच इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिले जाणारे 20% आरक्षण रद्द ठरवले. तरीही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त शिक्षकांची सेमी इंग्रजी शाळांवर नियुक्ती करणे हा न्यायालयाचा अवमान नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यम वेगळे आहे म्हणून विशेष सवलत दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले असतानाही त्याची पायमल्ली होत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना शिक्षक भरतीत (Teachers Recruitment) पूर्ण मराठी, पूर्ण इंग्रजी, सेमी इंग्रजी या सर्वच ठिकाणी संधी उपलब्ध आहे. परंतु मराठी माध्यमाच्या उमेदवारांना फक्त एकाच ठिकाणी संधी आहे. 2017 च्या अभियोग्यता चाचणी परीक्षेचा निकाल पाहता अत्यंत कमी गुण असणारा इंग्रजी माध्यम असणारा उमेदवार शाळेवर नियुक्त झालेला आहे. परंतु तुलनेने जास्त गुण असणारा मराठी माध्यमाचा उमेदवार नोकरीपासून वंचित आहे.
महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर होणार हा अन्याय विचार करायला लावणारा आहे. शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना दिली जाणारी विशेष सवलत थांबवून हे पत्रक रद्द करावे; अशी मागणी होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com