Success Story : तो शिक्षणासाठी मागे हटला नाही; कुबड्यांच्या आधाराने रोज 16 कि. मी. चालला; अखेर दहावी पास झालाच!!

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेणं आपल्याला कठीण नाही, म्हणून (Success Story) कदाचित आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. पण आपल्या आजूबाजूला असेही अनेक लोक आहेत जे शिक्षण घेण्यासाठी पराकोटीची धडपड करतात. शिक्षण घेणं हे त्यांच्यासाठी आपल्या एवढं सोपं नाही. ही मुलं केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर खडतर प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण अश्याच एका मुलाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने अपंगत्व आणि गरीबी समोर न झुकता आपली वाटचाल कायम ठेवली आहे. आपण वाचत आहोत अशा एका सचिन बद्दल जो परिस्थिती समोर हार न मानता शिक्षणासाठी झटत राहिला.

कातकरी समाजातील सचिन
आपल्या महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागांमध्ये शिक्षण घेणं खूप कठीण आहे, केवळ मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी सुद्धा. ह्या गावांना गरीबीने एवढ्या वाईट प्रकारे जखडून ठेवलंय की त्यातून निसटून जाणं फारच कठीण आहे. सचिन हा अश्याच एका गावचा रहिवासी आहे. जेमतेम 40 घरं असलेल्या (Success Story) या रायगड जिल्ह्यातील रोह तालुक्यातील कातकरी जमातीची लोकवस्ती आहे. सचिनचे पूर्ण नाव सचिन महेंद्र वाघमारे, घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आई वडील मोलमजुरी करत आणि एक दोन शेळ्यांचे पालन करत घर चालवण्याचा प्रयत्न करतात. सचिनला दोन बहिणी देखील आहेत ज्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या आहेत.

शिक्षकांनी घेतली जबाबदारी
मुळातच दिव्यांग असलेल्या सचिनची त्याच्या आई वडिलांना चिंता वाटायची. मात्र इथे त्याला मोठी मदत मिळाली ती त्याच्या शिक्षकाची. गजानन जाधव हे या भागात 2006 ते 2016 पर्यंत मुख्याध्यापक होते. त्यांनीच सचिनच्या आई वडिलांना आधार दिला, त्यांना समजावलं की सचिन जवळ शिकण्याची इच्छाशक्ती आहे, त्यामुळे त्याला घरात बसवून न ठेवता शिकण्याची परवानगी द्या. सचिनचे आई वडील दररोज सकाळी त्याला उचलून आणत आणि शाळेत सोडत असत व त्या नंतर त्याची सर्व जबाबदारी शिक्षक गजानन जाधव सांभाळायचे. दरम्यान गजानन जाधव ह्यांनी सचिनला तालुक्याला नेऊन उपचार केले, सचिनसाठी कृत्रिम बूट मागवण्यात आले पण अडचणी इथेच संपल्या नाहीत. या बुटांमुळे त्याला चालायला त्रास व्हायचा,उंच सखल चालीमुळे त्याला पाठीचाही त्रास झाला.

डोंगर चढून शाळेत जायचा (Success Story)
गावातली शाळा ही केवळ चौथी पर्यंत होती. इथून सुरु झाला सचिनचा खरा संघर्ष. दिव्यांग असलेला सचिन पुढे शिक्षण कसं घेईल हा प्रश्न निर्माण झाला. मात्र सचिन हार मानून मागे फिरणारा मुळीच नव्हता. तो धडधाकट माणसाला थकवेल असा डोंगर चढून शाळेत जायचा. ध्येय आणि इच्छाशक्ती माणसाकडून काय करवून घेऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन वाघमारे आहे.

कुबड्या घेवून रोज 16 कि.मी. चालायचा
पाचवीत शिकत असताना सचिनला घरापासून एक दोन किलोमिटरचा डोंगर चढून-उतरून, पुढे चार किलोमीटर कोलाडमधील माध्यमिक शाळेत जावं लागत असे. सचिनला असा रोजच प्रवास करायचा होता. त्यामुळे तो हे सर्व कसं करेल असा प्रश्न त्याच्या शिक्षकांना आणि पालकांना पडला होता. मात्र सचिन थांबला नाहीच. इच्छाशक्ती आणि ध्येय निश्चित असलं की तुम्ही कोणत्याही संकटावर मात (Success Story) करु शकता; हे सचिनने दाखवून दिलं.
शाळेच्या वेळे आधी एक ते दिड तास आधी घरातून लवकर निघायचं, कुबड्यांच्या साहाय्याने डोंगर चढायचा आणि उतरायचा. धडधाकट माणसालाही लाजवेल असा सचिनचा प्रवास सुरु होता. चालताना थांबत, कधी दमलेले पाय ओढत सचिन हा अवघड डोंगर पार करुन शाळा गाठत असे. तो नुसताच शाळेत जात नव्हता तर मनापासून अभ्यासही करत होता. बाकीचे विद्यार्थी दहावीच्या वर्षात मागे हटले पण सचिनने जिद्दीने ते वर्ष पूर्ण केलं आणि दहावीत ६१.८० टक्के गुण मिळवले.

वाघमारे कुटुंबातील शिकलेली ही पहिली पिढी
शिक्षण घेणारी वाघमारे कुटुंबातील ही पहिली पिढी. त्यामुळे मोठं होऊन कोण व्हायचं, असं काही स्वप्न नाही. केवळ आपल्या पायावर आपण उभं राहायचं हेच स्वप्न. कातकरी समाजात जिथे विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण जास्त आहे, तिथे राहून, डोंगर चढून शाळेत पोहोचणारा एक सचिन दहावीत पहिल्या प्रयत्नात फर्स्ट क्लास मिळवून पास झाला ही बाब निश्चितच कौतुकाची आहे.
सचिनने मन लाऊन आपला अभ्यास पूर्ण केला. दहावीच्या परीक्षेत 61.80% गुण मिळवलेल्या ह्या मुलाचे कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आपल्या शिष्यावर खुश होऊन त्याचे शिक्षक गजानन जाधव म्हणतात कि सचिनने अनेक अडचणीवर मात करत एखाद्या धडधाकट विद्यार्थ्याला लाजवेल अशी (Success Story) कामगिरी केली आहे; त्याचा मला अभिमान वाटतो.” सचिनची गुण पत्रिका बघून त्यांना अश्रू अनावर झाले होते. संकटांची पर्वा न करता खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सचिन वाघमारेचं  कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचा हा संघर्ष आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com