RTE Act : विद्यार्थ्यांनो… तुम्हाला 5 वी आणि 8 वीची परीक्षा पास होणे बंधनकारक; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश नाही

करिअरनामा ऑनलाईन । पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला (RTE Act) नापास करायचे नाही; असं धोरण 2010 पासून ‘आरटीई’अंतर्गत (RTE) राबवण्यात येत आहे. पण आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, आणि जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’ ॲक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे 2010 पासून आतापर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता 10वी, 12 वीच्या अभ्यासक्रमात (RTE Act) पिछाडीवर राहिले. परिक्षेत आलेल्या अपयशामुळे अनेकांना मधूनच शाळा देखील सोडावी लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल; असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नापास विद्यार्थ्याला मागे थांबावे लागणार (RTE Act)
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला आता यापुढे पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.

नापास झाल्यास 30 दिवसांत मिळणार दुसरी संधी
इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पार पडल्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी नापास होतील त्यांना परीक्षेची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. एक महिन्यानंतर (RTE Act) त्यांची पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा होईल. त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन बदलानुसार इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. दुसरी संधी देऊनही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागेल. आता या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद केली जाणार आहे; अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे; यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com