करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यामुळे दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे; अशी माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
प्रशिक्षण कधी सुरू होणार?
राज्यातील ५ व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी (Police Bharti 2024) संपणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती आहे.
अशी होते मैदानी चाचणी (Police Bharti 2024)
1. पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात.
2. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे.
3. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील.
4. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत.
5. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com