MPSC चा मोठा निर्णय; राज्यसेवेच्या परीक्षापद्धतीत केला बदल

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरुप आहे. याबाबत एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती देण्यात आली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन म्हणजेच CSAT हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारसीही एमपीएससीने स्वीकारल्या.

सुधारित परीक्षा योजनेमध्ये वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे. यामध्ये एकूण नऊ पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५असतील.

सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. तसेच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना वैकल्पिक विषय निवडता येईल. सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.