Medical Admission : राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या तब्बल 1000 जागा वाढल्या

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकलचे शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (Medical Admission) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यातील मेडिकल अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. MBBS च्या 900 आणि BDS च्या 100 जागा पुन्हा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश नव्हता. आता या संस्थांना मान्यता मिळाल्याने दुसऱ्या फेरीसाठी हजार जागा पुन्हा वाढल्या आहेत.

NEET UG 2023 एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती दि. 31 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतील एमबीबीएसच्या 100 जागांसह इतर सात खासगी संस्थांमधील 900 जागांचाही प्रवेशासाठी समावेश करण्यात आला होता.

मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली नव्हती. मान्यता नसल्याने आठ संस्थांना प्रथम प्रवेश फेरीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीतून MBBSच्या 900 आणि BDSच्या 100 जागा कमी झाल्या. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे सदर महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये करण्यात येणार आहे.
राज्यातील एमबीबीएसच्या जागांचा तपशील (Medical Admission)
1. महाविद्यालये – 32
2. सरकारी जागा – 5 हजार 200
3. खासगी महाविद्यालयांतील जागा – 3 हजार 70
4. एकूण – 8 हजार 270
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com