मराठा आरक्षण: भरती प्रक्रिया पडणार लांबणीवर; लाखो उमेदवारांवर न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबत निर्णय काही दिवसापूर्वी आला. मराठा आरक्षण रद्द केल्याने आता प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती (एमपीएससी) अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर याचे पडसाद उमटणार आहेत. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यास पुन्हा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट होऊन भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय पदभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो उमेदवारांना आता नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यामध्ये एमपीएससीमार्फत विविध शासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. एमपीएससीमार्फत २०२० साठीची भरती प्रक्रिया करोना संकटामुळे अजूनही सुरूच आहेत. तर २०२१ च्या पदभरतीसाठीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. शिक्षक भरती प्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाही. तसेच, १२ हजार शिक्षक भरतीमध्ये जवळपास साडेपाच हजार पदांची भरती होणे अद्याप शिल्लक आहे. त्याशिवाय प्राध्यापक भरती आणि प्राचार्य भरतीही राबवली जाणार आहे. या सर्व भरती प्रक्रियांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पदभरती प्रक्रियेवर परिणाम होणार असून, आरक्षणानुसार पदांची संख्या बदलावी लागणार आहे. यामुळे उमेदवारांची चिंता अजून वाढणार आहे.

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे. राज्य शासन पुनर्विचार याचिकाही दाखल करू शकते. मात्र, मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय काय लागतो यावर भरती प्रक्रियेतील आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे आरक्षण लागू असलेल्या सर्व प्रकारच्या पदांची भरती प्रक्रिया राबवणे सध्याच्या स्थितीत तरी अवघड असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील लाखो उमेदवारांची एमपीएससीद्वारे होणारी भरती, शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरतीकडे लक्ष लागलेले आहे.