Layoffs : डोकेदुखी!! तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या; गुंतवणूक कमी झाल्याने देशातील स्टार्टअप कंपन्यांनी केली नोकर कपात 

करिअरनामा ऑनलाईन । देशात होणारा विदेशी गुंतवणुकीचा (Layoffs) ओघ गेल्या काही महिन्यांपासून आटला आहे. याचा फटका स्टार्ट अप कंपन्यांना बसला असून परिणामी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ‘CTEL’ कंपनीने जारी केलेल्या अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

स्टार्टअप्स संकटात 
या अहवालानुसार, चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत 70 पेक्षा अधिक स्टार्टअप (Start Up) कंपन्यांनी सुमारे 17 हजार कर्मचारी कमी केले आहेत. या कंपन्यांमध्ये एडटेक, ई-कॉमर्स, फिनटेक, फूडटेक, हेल्थटेक अशा विविध क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. अनेक युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांचाही यात (Layoffs) समावेश आहे. सहा एडटेक कंपन्या, ई-कॉमर्समधील १७, फिनटेकमध्ये, एपीआय बँकिंग उत्पादने, ब्रोकरेज आणि म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, विमा आणि पेमेंट सोल्यूशन्स देणाऱ्या 11 स्टार्ट-अप कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत. फूडटेक, हेल्थटेक आणि लॉजिस्टिक सेवा, तसेच सास क्षेत्रातील अनेक स्टार्टअपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

अशी आहेत कंपन्यांसमोरील आव्हाने 
निधीची कमतरता हे या कंपन्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. स्टार्टअपना त्यांची वाढ टिकवून ठेवणे आणि नवी गुंतवणूक आकर्षित करण्यातही अडथळे येत आहेत, त्यामुळे खर्च कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी कर्मचारी संख्या कमी करण्यावर भर दिला आहे, असे सीटीईएलच्या अहवालात म्हटले आहे. वाढता भांडवली खर्च, चढे व्याजदर, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे मूल्य अशा विविध कारणांमुळे गुंतवणुकीचा (Investments) ओघ आटत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गुंतवणूक आटली (Layoffs)
भारतातील स्टार्टअपना मिळणाऱ्या व्हेंचर कॅपिटलमध्ये 2023 च्या पहिल्या सहामाहीत जोरदार घट झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गुंतवणुकीत 79 टक्के घसरण झाली. फिनटेक, एडटेक आणि एंटरप्राइझ-टेक यांसारख्या क्षेत्रांवर याचा अधिक प्रभाव जाणवला.
व्हेंचर इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, या पहिल्या सहामाहीमध्ये एकूण गुंतवणूक केवळ 3.8 अब्ज डॉलर इतकी होती. मागील वर्षीच्या याच कालावधीत हे प्रमाण 18.4 अब्ज डॉलर होती. निधी गुंतवण्याबाबतच्या व्यवहारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, ती मागील वर्षातील याच सहामाहीतील 727 वरून 60 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 293 वर आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com