करिअरनामा ऑनलाईन । IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी (IAS Success Story) तुम्हाला योग्य रणनिती आखून स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी सुरभी गौतम. तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला घडवले आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा बनली आहे.
कोणतीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे खूप मोठे यश आहे, अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. परंतु तरी देखील अनेकांना ही परीक्षा पास करणे कठीण होते. काही लोकांनाच हे यश गाठता येते. तसे पाहता UPSC परीक्षेत पास होण्यासाठी किंवा त्याची तयारी करण्यासाठी सर्व उमेदवारांची स्वतःची एक रणनीती तयार असते, ज्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरु असते. परंतु त्यांचीच रणनीती वापरुन दुसऱ्या व्यक्तीला ती परीक्षा पास करता येईल की नाही याबाबत शाश्वती देता येत नाही.
बोर्डाच्या परिक्षेत मिळायचे 90 टक्क्यांहून जास्त मार्क (IAS Success Story)
मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात राहणारी सुरभी गौतम लहानपणापासूनच हुशार होती. तिने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत, कोणताही क्लास न लावता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या परिक्षेत तिला 90 टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत. तिचे वडील दिवाणी न्यायालयात वकील आहेत तर आई शिक्षिका आहे.
उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी पहिली मुलगी
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभीने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली आणि या परिक्षेत तिला घवघवीत यश मिळाले. तिच्या गावातून उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी ती पहिली मुलगी होती. तिने भोपाळमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. इथे तिने विद्यापीठात अव्वल स्थान मिळविले. ती या महाविद्यालयची गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी ठरली आहे.
अनेक अवघड परीक्षा केल्या पास
सुरभी गौतमने UPSC परीक्षा देण्यापुर्वी अनेक परीक्षा (IAS Success Story) उत्तीर्ण केल्या होत्या. सुरभी गौतमने एक वर्ष बीएआरसीमध्ये (BRC) अणुशास्त्रज्ञ म्हणूनही काम केले आहे. तिने GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलिस आणि FCI सारख्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. एवढेच नाही तर 2013 मध्ये झालेल्या IES परीक्षेत सुरभीने AIR 1 मिळवला होता.
इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे लोक खिल्ली उडवायचे
इतक्या परीक्षा पास करणारी सुरभी अभ्यासात हुशार असली तरी तिला चांगलं इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे लोक तिला चिडवायचे, तिची खिल्ली उडवायचे. पण तरीही तिने आशा सोडली नाही. तिने जिद्दीने तिच्या कमकुवतपणावर मात केली आणि तिला कमी लेखणाऱ्या लोकांना आपल्या कृतीने चोख उत्तर दिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com