करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्या द्वारका येथे जन्मलेली विशाखा… अभ्यासात (IAS Success Story) पहिल्यापासूनच हुशार… तिने अभ्यासात घेतलेल्या आघाडीमुळे तिला दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मध्ये प्रवेश मिळाला. जिथे तिने 2014 मध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. तिच्या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम सुरू केले. आरामदायी आणि मोठ्या पगरची नोकरी तिला मिळाली होती; पण तिचे ध्येय तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिला वेगळेच क्षेत्र खुणावत होते. त्यामुळे तिने ही सुरक्षित नोकरी सोडून आयएएस (IAS) अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. समोर आलेल्या अडथळ्यांवर मात करत विशाखाने अखेर स्वप्न पूर्ण केलेच. जाणून घेवूया…
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
विशाखा यादवची (IAS Vishakha Yadav) कहाणी म्हणजे एक अखंड समर्पणाचा पुरावा आहे. एक सुरक्षित, बड्या पगाराची नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. विशाखाला खऱ्या अर्थाने कुटुंबाने भक्कम पाठिंबा दिला. तिचे वडील राजकुमार यादव आणि आई सरिता यादव दोघे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ती हा खडतर प्रवास पार करु शकली; असं विशाखा मानते.
सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी
1994 साली नवी दिल्लीच्या द्वारका येथे विशाखाचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आणि तिथून तिने 2014 मध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. तिच्या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी मिळवली.
आयुष्यात हा ठरला टर्निंग पॉइंट
बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून विशाखा काम करत होती. मात्र 2017 मध्ये विशाखाने तिची आरामदायी नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. UPSC ची परीक्षा पास करायचीच असा चंग तिने बांधला. तिने कठोर अभ्यासासाठी (IAS Success Story) स्वतःलाच वचनबद्ध केले. सोशल मीडियासारख्या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले आणि पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. यासाठी ती लायब्ररीमध्ये बरेच तास अभ्यासात घालवत असे. मनाला विरंगुळा देण्यासाठी ती सुडोकू कोडी सोडवत असे.
अडथळ्यांवर मात करुन देशात ठरली टॉपर
विशाखाच्या (IAS Vishakha Yadav) मार्गात अनेक आव्हाने येत होती. संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिला 2 वेळा अपयश आले. पण तिने धीर धरला. आधी झालेल्या चुका सुधारून तिने पुन्हा परीक्षा दिली. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. यावेळी तिने कमाल केली. ती फक्त परीक्षा पास झाली नाही; तर यावेळी ती संपूर्ण भारतातून 6 वा क्रमांक (AIR 6) मिळवत टॉपर ठरली. कठोर परिश्रम, समर्पण आणि अथक प्रयत्नाने कोणतेही ध्येय साध्य केले जाऊ शकते; हे विशाखाकडून शिकायला मिळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com