करिअरनामा ऑनलाईन । काही लोकांच्या नशिबी खूपच गरिबी वाढून ठेवलेली असते. अशातही ते परिस्थिती बदलण्यासाठी झगडत असतात. आज अशीच एक यशोगाथा करिअरनामा तुम्हाला सांगणार आहे. यातून तुम्हालाही प्रेरणा मिळणार आहे. अशाच संघर्षातून फोजदार झालेल्या युवराज पवारची कहाणी! घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार? रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता. अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि आजवरचा सारा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. चिकुर्डे हे वारणाकाठचे गाव. अभिजितचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याने आईने त्याला मामाकडे पाठवले.
वारणा महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. मुळात तो हुशार. दहावीनंतर त्याला विज्ञान शाखेतही प्रवेश मिळाला असता; पण या शाखेचा खर्च परवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने कला शाखेला प्रवेश घेतला. सकाळी जनावरांसाठी शेतातून वैरण आणणे आणि त्यानंतर दिवसभर ग्रंथालयात तो अभ्यास करू लागला. घरी आल्यानंतर रात्री एकपर्यंत तो अभ्यासातच असायचा. ‘एमए’ होईपर्यंतचा सारा प्रवास त्याचा सायकलवरूनच सुरू होता. एकदा तर सायकल दुरुस्तीला पैसे नाहीत म्हणून त्याने खांद्यावर सायकल मारून घरी आणली होती. दरम्यानच्या काळात , राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत सलग सात वर्षे हो विजेता ठरला.
अभ्यास करत असतानाच पेट्रोल पंप, वारणा दूध संघ, वाळूच्या ठेक्यावरही त्याने कामही केले. ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या आईलाही तो मदत करायचा. मात्र शिक्षणाची कास सोडली नाही आणि अधिकारी होण्याचं स्वप्न कधीही विसरले नाही. पुढे गावातच त्याने अभ्यासिका सुरू केली. २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. “सुरवातीला थोडक्यात यश हुकले. मात्र पुन्हा तो नेटाने कामाला लागला आणि यश खेचून आणले. ध्येय ठरवले आणि झपाटून कामाला लागलो. सलग अकरा तास अभ्यासाचे नियोजन केले. एकदा अपयश आले. मात्र पुन्हा नेटाने अभ्यास सुरू केला आणि यश खेचून आणले” अशी प्रतिक्रिया त्यांनी करियरनामाशी बोलताना दिली.