मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी MPSC परीक्षा उधळून लावू नका! मराठा परीक्षार्थींचं आंदोलकांना आवाहन

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला आहे. मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन मराठा समजतील परीक्षांर्थींनी केली आहे. मराठा समाजातील वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या मुलांचे नुकसान होणार असल्याने परीक्षा रद्द न करता ती होऊ द्यावी अशी मागणी या मुलांनी केली आहे.

राज्यसेवा पदांच्या भरतीची परीक्षा पहिल्यांदा 4 एप्रिल रोजी होणार होती. यासाठीचे पेपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून हॉल तिकीटही बनली होती. पुन्हा ती 26 एप्रिलपर्यंत लांबली त्यानंतर 20 सप्टेंबरपर्यंत लाभल्यावर शेवटी 11 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. या परीक्षेसाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून जवळपास 3 लाख मराठा समाजातील तरुण दिवसरात्र तयारी करीत असून आता ही 200 जागांसाठी असलेली परीक्षा होणे गरजेचे असल्याचे संदीप बाड या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षण समाजातील तरुणांना हवे आहे मात्र ही परीक्षा रद्द झाल्यास या परीक्षेसाठी तयारी करणारे आणि ज्यांची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या हजारो तरुणांना यापुढे राज्यसेवेची परीक्षा देता येणार नसल्याने मराठा संघटनांनी परीक्षा होऊ द्याव्यात. मात्र भरती प्रक्रिया सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर घेण्याची मागणी करावी अशी भूमिका घेतली आहे. येत्या रविवारी ही परीक्षा होणार असून सकल मराठा मोर्चाने ही परीक्षा रद्द न केल्यास उधळून लावण्याची धमकी दिल्यानंतर हे तरुण अस्वस्थ झाले आहेत.