Diwali Business Ideas : दिवाळी धुमधडाक्यात करायचीय?? सणासुदीच्या काळात ‘हे’ व्यवसाय करा… गुंतवणूकही आहे कमी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडेच सणांची (Diwali Business Ideas) धामधूम सुरु आहे. दिवाळीसारखा सण म्हटला की मोठ्या प्रमाणात खरेदी होते. वर्षातून एकदा येणारा सण सगळेजण दणकून साजरा करतात. पण पैसा हातात असेल तरच तुम्ही या उत्सवाचा मनमुराद आनंद घेवू शकता. कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल असा विचार अनेकांच्या  मनात घोळत असेल. यासाठीच आजचा लेख आहे. आज आम्ही तुम्हाला कमी भांडवलामध्ये कोणता व्यवसाय सुरु करता येईल; याविषयी मार्गदर्शन करणार आहोत.

सणासुदीच्या काळात अनेक दुकानं आणि ई-कॉमर्स वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स, डिस्काउंट, कॅशबॅक जाहीर करत आहेत. सणासुदीच्या काळात लोकांचा खरेदीकडे कल वाढतो. तसंच या काळात बरेचजण भेटवस्तूंची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करतात. या संधीचा फायदा घेत अल्प भांडवलावर एखादा छोटा व्यवसाय करण्याची ही उत्तम संधी असते. या काळात तुम्ही अल्पावधीत चांगला नफा मिळवू शकता.

रांगोळी विक्री (Diwali Business Ideas)
दिवाळी म्हणलं की अंगणभर रांगोळी काढणं आलंच. अनेकजण हाताने आकर्षक रांगोळी रेखाटतात शिवाय अनेकजण  हातानं रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचे नक्षीदार स्टिकर्स दारात आणि उंबरठ्यावर चिटकवण्यास प्राधान्य देत आहेत. अशास्थितीत तुम्ही पांढरी रांगोळी, रंगीत रांगोळी, रांगोळीचे छाप, संस्कार भारती रांगोळीचे कलर्स; स्टीकर्स याचा व्यवसाय नक्कीच करू शकता. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. रांगोळीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स काढून त्याची यादी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथंदेखील तुम्ही रांगोळीचं साहित्य, स्टिकर्स विक्रीसाठी ठेवू शकता.

सजावटीसाठी लाईटच्या माळा, तोरणांचा व्यवसाय
दिवाळी म्हणलं की, घर, ऑफीस, दुकानांची सजावट आलीच. तुम्ही अल्प भांडवलावर व्यवसाय करू इच्छित असाल तर दिवाळीच्या काळात विविध प्रकारची तोरणे, लाईटच्या माळा विकू शकता. अनेक जण घराच्या, ऑफिसच्या तसेच दुकानांच्या  सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, लाईटच्या (Diwali Business Ideas) माळा खरेदी करतात; मात्र लाईटच्या माळांचा व्यवसाय करण्यापूर्वी तुमचे टार्गेट कस्टमर्स कोण आहेत, याचा शोध घ्या. अशा कस्टमर्सच्या मागणीनुसार लाईटच्या माळांमध्ये गुंतवणूक करून त्यांची विक्री करा. अभ्यास न करता व्यवसाय सुरू केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं.

मातीच्या खेळण्यांचा व्यवसाय
दिवाळीच्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले मातीचा किल्ला आवर्जून बनवतात. या किल्यावर मांडण्यासाठी मातीच्या खेळण्यांची आवश्यकता असते. शिवाजी महाराज, मावळे, तोफा, विविध प्रकारचे प्राणी यांना या काळात मोठी मागणी असते. आपल्या मुलांसाठी किंवा दुसऱ्या मुलांना भेट देण्यासाठी खेळणी खरेदी केली जातात. घराच्या सजावटीसाठी देखील मातीच्या पणत्यांची खरेदी होते. त्यामुळे तुम्ही खेळणी आणि पणती विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्ही सुरुवातीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा देखील वापर करू शकता.

फटाक्यांचा व्यवसाय 
दिवाळीत अबाल वृध्दांमध्ये फटाक्यांचं मोठं आकर्षण असतं. या काळात मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी होते. त्यामुळे  तुम्ही फटाके विक्रीचा व्यवसाय सुरु करू शकता. फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्हाला चांगले पैसे कमावता येतील. फटाके विक्रीसंदर्भात प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या राज्यातले नियम आणि कायद्यांविषयी माहिती अवश्य घ्या; जेणेकरुन तुमचं नुकसान होणार नाही.

वॉल पेंटिंग (Diwali Business Ideas)
वॉल पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला, तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला स्वतःला पेंटिंग्जची आवड असेल तर तुम्ही एक्सक्लुसिव्ह पेंटिंग्ज विकू शकता. सणासुदीच्या काळात घराच्या सजावटीसाठी वॉल पेंटिंग्ज खरेदी केली जातात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला दुकानाची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता. तसंच फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर तुम्ही स्वतः एक विक्रेता म्हणून रजिस्टर करून वस्तूंची विक्री करू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथं किंवा एखाद्या मित्राच्या दुकानात तुम्ही पेंटिंग्ज विक्रीला ठेवू शकता. यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com